पणजी : मुंबईत नौदलाला एक इंचही जागा देणार नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात पण गोव्यात मात्र ते मोठमोठे प्रकल्प गोमंतकीयांवर लादू पाहत आहेत. गोमंतकीयांच्या नद्या वगैरे धोक्यात आल्या आहेत. जनमत कौल साजरा करतानाच गोमंतकीयांनी गडकरी यांच्या योजनांबाबत सावध रहावे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.
गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण व्हायला नको म्हणून गोव्यात जी चळवळ 1967 सालच्या आसपास सुरू झाली होती, त्या चळवळीत आपण सहभागी झालो होतो. आम्ही गोवा राज्याचे अस्तित्व स्वतंत्र राखले पण आज केंद्र सरकारच्या डावापासून गोव्याला धोका संभवतो. गोव्यातील नद्यांचे राष्ट्रीयीकरण करून केंद्र सरकार नद्या ताब्यात घेत आहे. मोठमोठ्या धक्क्यांचे बांधकाम नद्यांच्या किनारी गडकरी करू पाहत आहेत. जर गोव्यातील नद्या, जमिनी वगैरे गडकरी यांच्या मंत्रालयाच्या ताब्यात गेल्या तर गोव्यात गोमंतकीयच परकी होतील. गोमंतकीयांना कोणतेच हक्क राहणार नाहीत, असे रवी नाईक म्हणाले.
गोवा सरकारला सध्या जनमत कौलाबाबत नकली प्रेम वाटत आहे. जनमत कौल दिवसाचे नकली साजरीकरण सुरू झाले आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी हे सगळे करत आहे. भाजपाला त्यापासून लाभ व्हावा, असे गोवा फॉरवर्डला वाटते पण तसे होणार नाही, असेही नाईक म्हणाले.
महाराष्ट्र राज्य आम्हाला परकी नव्हे पण गोमंतकीयांचे स्वत:चे राज्य असावे म्हणून महाराष्ट्रातील विलिनीकरणाला आम्ही विरोध केला होता. त्यावेळी बरेच लोक विलिनीकरणाच्या बाजूने होते. पूर्ण फोंडा तालुकाही विलिनीकरणाच्या बाजूने होता. आता तर विलिनीकरण कुणालाच नको आहे. महाराष्ट्र हा भारताचाच भाग आहे. मात्र आता केंद्र सरकारच्या विविध योजनांपासून गोव्याने सावध राहावे. म्हादई पाणीप्रश्नी कर्नाटक गोव्यावर अन्याय करत आहे. दुस-या बाजूने गोव्यातील नद्यांची मालकी जर गडकरी यांच्या मंत्रालयाकडे गेली तर, गोव्याच्या नद्या गोमंतकीयांसाठी शिल्लक राहणार नाहीत, असे रवी नाईक म्हणाले.
स्वर्गीय जॉक सिक्वेरा हे विलिनीकरणविरोधकांचे नेते होते. ते विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे गोवा विधानसभेसमोर सिक्वेरा यांचा पुतळा सरकारने उभा करावा,अशी मागणीही नाईक यांनी केली. स्व. भाऊसाहेब बांदोडकर हयात होते तेव्हा आपण महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात गेलो नव्हतो. स्व. शशिकला काकोडकर यांची राजवट गोव्यात होती, त्यावेळी आपल्या काही मित्रंनी विनंती केली म्हणून आपण मगो पक्षात गेलो होतो, असेही नाईक म्हणाले.