पणजी : सध्या आजारी असलेले ज्येष्ठ साहित्यिक, रहस्यकादंबरीकार गुरुनाथ नाईक यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ७५ हजार रुपयांचा धनादेश रविवारी नाईक यांना प्रदान करण्यात आला. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण विश्वस्त निधीतून ही मदत देण्यात आली असून, राज्य शासनाच्या वतीने कोल्हापूरचे माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी हा धनादेश नाईक यांच्याकडे सुपूर्द केला.रहस्यकथांचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असलेले नाईक यांनी दीर्घकाळ पत्रकारिताही केली आहे. गेली काही वर्षे ते गोव्यात स्थायिक झाले आहेत. अलिकडे वयोमानानुसार त्यांची प्रकृती बिघडली असून, सद्या ते पणजी येथील एका खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृती अस्वस्थ्याबद्दल माहिती मिळाल्यावर माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी त्याची दखल घेऊन नाईक यांच्या औषधोपचारासाठी पत्रकार कल्याण विश्वस्त निधीमधून मदत देण्याचे आदेश दिले. माहिती संचालक (प्रशासन) अजय अंबेकर, माहिती संचालक (वृत्त-जनसंपर्क) शिवाजी मानकर यांनी याबाबतची कार्यवाही तातडीने करून पत्रकार कल्याण विश्वस्त निधीमधून मदत देण्याची कार्यवाही केली.आज लळीत यांनी पणजी येथील इस्पितळात नाईक यांची भेट घेतली व त्यांना धनादेश सुपुर्द केला. नाईक यांच्या प्रकृतीमध्ये लवकरच सुधारणा होऊन त्यांनी पूर्ववत साहित्यसेवा सुरू करावी, यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
गोमंतकीय साहित्यिक गुरुनाथ नाईक यांना महाराष्ट्र शासनातर्फे मदत जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 4:21 PM