विशांत वझे, लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: विस्मृतीत गेलेल्या गोमंतकीय पारंपरिक कावी कलेला पुनर्जिवित केले जाईल. हा समृध्द रसा नव्या पिढीसमोर आणून करण्यासाठी राजभवनातर्फे विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मंदिरात या कलेचे आजही दर्शन घडते आहे. ही कला जोपासण्यासाठी आमचे विशेष प्रयत्न असतील, असे प्रतिपादन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले. अडवलपाल येथील हनुमान मंदिर परिसरातील कावी कलेची राज्यपालांनी पाहणी केली. शर्वाणी देवीचे दर्शन त्यांनी यावेळी घेतले.
यावेळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, सरपंच, देवस्थान सदस्यांनी राज्यपालांचे स्वागत केले. त्यानंतर राज्यपाल पिल्लई यांनी लामगाव येथील आनंद देसाई यांच्या पुरातन वाड्यास भेट दिली. त्याठिकाणी असलेल्या कावी कलेचे त्यांनी कौतुक केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज्यपाल म्हणाले की, मी गोव्यातील बहुतांश खेडेगावाला भेट दिली आहे. महात्मा गांधींनी खेड्यांचा विकास होणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. त्याच प्रेरणेने गावांतील पुरातन वास्तूकलांचा अभ्यास करताना लोकांशी संपर्क आला. आज झपाट्याने विकास होताना भारतीय संस्कृती, लोककला, पुरातन वास्तूंचे तितक्याच आत्मियतेनं संवर्धन करताना नव्या पिढीसाठी हा पुरातन खजिना उपलब्ध करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याच ध्येयाने कावी कलेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.
राज्यपालांनी गोव्यातील पुरातन वृक्ष संपदेचा, सांस्कृतिक ठेव्याचा विशेष उल्लेख केला. आपल्या लेखनातून गोव्यातील विविध खेडेगाव, वृक्ष, श्वेत कपिला गाय आदींची माहिती संकलित केल्याचे त्यांनी सागितले. ते म्हणाले की, गोवा केवळ सागरी पर्यटनासाठी नाही तर ग्रामीण पर्यटनासाठी विशेष महत्वाचे ठिकाणी आहे. आरोग्य पर्यटनही येथे होऊ शकते. यावेळी आनंद देसाई व देसाई परिवारातील मंडळींनी राज्यपालांचे दिमाखादार स्वागत केले. राज्यपाल सरदेसाई वाडा पाहून खुश झाले. यावेळी रिटा पिल्लई, मिहीर वर्धन, श्री. राव आदी उपस्थित होते.