पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाची स्थिती गंभीर बनली असून इस्पितळातील उपचार रुग्णांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आहे. जनरेशन नेक्स्टने केलेल्या खास सर्वेक्षणाचा अहवाल आरोग्य खात्याचे मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना पाठविण्यात आला आहे. यात प्रामुख्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचा सर्व कारभार हाताळण्यासाठी प्रशासक म्हणून आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी जनरेशन नेक्स्टचे अध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केली आहे. जनरेशन नेक्स्टच्या सदस्यांनी दोन आठवडे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभागात जाऊन पाहणी केली. तेथील कामाचा अनुभव घेतला. तसेच अंतर्गत माहितीद्वारे बांबोळी इस्पितळात चालणाऱ्या अनेक बेकायदेशीर बाबी सरकारच्या नजरेस आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. आरोग्य ही सर्वसामान्यांच्या हिताची आणि गरजेची बाब असल्याने याकडे दुर्लक्ष करणे अत्यंत घातक ठरू शकते. गोवा वैद्यकीय इस्पितळात मुदत संपत आलेली औषधे रुग्णांना दिली जातात. शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी वैद्यकीय उपकरणे यंत्राद्वारे स्वच्छ न करता साध्या औषधात घालून स्वच्छ केली जातात आणि पुन्हा तीच वापरण्यात येतात. अशा उपकरणांमुळे रुग्णांना इन्फेक्शनही होऊ शकते. यावर गंभीर लक्ष देण्याची गरज आहे. इस्पितळातील बिघडलेली यंत्रे दुरुस्त करून त्याचा वापर सुरू करण्याची आवश्यकता आहे. येथील एकमेव असणाऱ्या औषधालयाची स्थिती भयानक असून येथील औषधे लोकांसाठी आजार ठिक करण्याचे वगळता अधिक आजारी बनविण्यास कारणीभूत ठरू शकतात. औषधालयात मुदत संपत आलेली औषधे स्वीकारली जातात. त्यामुळे पुन्हा पुन्हा नवीन औधषे घ्यावी लागतात. औधषांच्या आॅर्डर्समध्ये कमिशनचा व्यवहार चालत असल्याचा आरोपही कामत यांनी केला. राज्यातील ९0 टक्के औषधालये कॉम्प्युटराइज्ड आहेत. मात्र, गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील औषधालयातील व्यवहार अजूनही पेनाने चालतो. अशा व्यवहारात अफरातफर करता येते. हे औषधालयही संगणकीय करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच इस्पितळात अतिरिक्त २ ते ३ औषधालये उघडण्यात यावीत जेणेकरून औषधांसाठी आजारी रुग्णांना रांगेत राहावे लागणार नाही. (प्रतिनिधी)
गोमेकॉचा प्रशासक आयएएस असावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2016 2:39 AM