मडगाव (गोवा): गोव्यातील सर्व समुद्र किना-यावरील स्विमिंग झोन ९ आॅक्टोबरपासून अधिकृतरीत्या खुले होणार आहे. पावसाळ्यात गोव्यात सुरू असलेली समुद्रस्नानाची बंदी ९ आॅक्टोबरपासून उठणार आहे. गोव्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या दृष्टी लाईफ सेव्हिंग या आस्थापनाने ही घोषणा केली आहे. याचबरोबर पर्यटकांनी समुद्रस्नान करताना घ्यायच्या खबरदारीची सूचीही जाहीर केली आहे.पावसाळ्यात दर्या खवळलेला असल्यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्यटकांना समुद्रस्नानास बंदी घालण्यात आली होती. असे असतानाही काही पर्यटक जीव धोक्यात घालून समुद्रात उतरत होते. धोक्याची सूचना देण्यासाठी सर्व किना-यांवर लाल बावटे लावण्यात आले होते. आता ९ आॅक्टोबरपासून हे निर्बंध काढले जाणार आहेत.गोव्यातील ३८ समुद्र किना-यांवर दृष्टीकडून एकूण ६00 जीवरक्षकांची तैनात केली जाणार आहे. त्यातील २२ समुद्रकिनारे दक्षिण गोव्यातील तर १६ समुद्र किनारे उत्तर गोव्यातील आहेत. एरव्ही गोव्यातील इतर समुद्र किना-यावर स्नान करणे धोकादायक नसले तरी हणजुणा समुद्र किनारा खडकाळ असल्याने या किना-यावर आंघोळ करणे एकदम धोकादायक असल्याचे यासंबंधीच्या एडव्हायझरीत नमूद केले आहे. सकाळी ७.३0 ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गोव्यातील महत्वाच्या समुद्र किना-यावर जीवरक्षकांची तैनात केली जाईल, असे दृष्टीने कळविले आहे.अशी घ्या खबरदारीसमुद्र किना-यावर स्नान करताना आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवा. जेणे करून कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही. दुपारी १२ ते ४ पर्यंत दर्या खवळलेला असल्याने यावेळी पाण्यात उतरू नका. निर्जन समुद्र किना-यावर किंवा जीवरक्षक तैनात नसलेल्या जागी स्नान करणे टाळा.सुकतीच्या वेळी समुद्रातील दगडावर चढण्याचा धोका पत्करू नका. कारण हे दगड निसरडे असतात. सुरक्षा रक्षकांकडून दिल्या जाणा-या सूचना लक्षपूर्वक ऐका. लाल बावटा असलेल्या जागेत स्नानाला जाऊ नका.या समुद्र किना-यावर असणार जीवरक्षकदक्षिण गोवा : बायणा, बोगमोळो, वेळसांव, होलांट, आरोसी, माजोर्डा, उतोर्डा, बेताळभाटी, कोलवा, बाणावली, ताज बाणावली, वार्का, झालोर, केळशी, मोबोर, आगोंदा, पाळोळे, पाटणे, राजबाग, तळपण, गालजीबाग व पोळे.उत्तर गोवा : केरी, हरमल, आश्र्वे, मांद्रे, मोरजी, वागातोर, अंजुणा, बागा, कळंगूट, कांदोळी, सिकेरी, मिरामार, वायंगिणी —दोनापावल, शिरदोन व बांबोळी.
खूशखबर! गोव्यातील स्वीमझोन सोमवारपासून पर्यटकांना खुले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 6:49 PM