पणजी : सरकारी नारळ विक्री उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात आज फातोर्डा व आल्तिनो पणजी अशा दोनच ठिकाणच्या प्रत्येकी एका दालनामधून नारळ विक्री होईल. पंधरा ते वीस रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
गोवा फलोत्पादन विकास महामंडळावर अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कृषीमंत्री विजय सरदेसाई तसेच कृषी संचालक नेलसन फिगरेदो यांनी लोकमतला सांगितले की, येत्या पंधरा दिवसांत फलोत्पादन महामंडळाच्या सर्व दालनांमधून नारळ विक्री सुरू होईल. आज फक्त दोनच दालनांमध्ये नारळ विक्रीचा शुभारंभ होईल. आल्तिनो येथे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते तर फातोर्डा येथे मंत्री सरदेसाई यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
फिगरेदो यांनी सांगितले, की ठरलेल्या योजनेप्रमाणो सर्व दालनांमध्ये पुढील पंधरा दिवसांत नारळ विक्री सुरू होईल. नारळाच्या आकारानुसार तीन वेगवेगळ्य़ा प्रकारचे दर निश्चित करण्यात आले आहेत. पंधरा रुपये, अठरा रुपये व वीस रुपये असे तीन दर ठरविण्यात आले आहेत. एकदम मोठय़ा संख्येने नारळ उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने आम्ही अंमलबजावणी करू. पंधरा दिवसांत सर्व टप्पे पूर्ण होतील. स्थानिक जे बागायतदार, विक्रेते वगैरे आहेत त्यांच्याकडून नारळ विकत घेतले जातील.
दरम्यान, काँग्रेसच्या महिला शाखेने बुधवारी येथे पत्रकार परिषद घेतली. प्रत्येकी दहा रुपये दराने नारळाची विक्री व्हायला हवी, असे महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या. सरकारने केवळ राजकीय स्टंट करू नये. नारळ विक्रीची सविस्तर योजना जाहीर करावी, असे कुतिन्हो म्हणाल्या. काँग्रेसच्या महिला शाखेने राज्यभर केलेल्या आंदोलनामुळेच सरकारला महागाईची व नारळाच्या वाढत्या दरांची दखल घ्यावी लागली. त्यामुळे आपण अनुदानित दराने नारळ विक्री करू अशी घोषणा सरकारने केली. जर सरकारने कमी दरात नारळ विक्री केली नाही तर पुढील वर्षभर महिला काँग्रेसची नारळ विक्री करण्याची तयारी आहे. आम्ही पंधरा हजार नारळांची अवघ्याच दिवसांत विक्री केली. लोकांनी त्यास मोठा प्रतिसाद दिला व त्यामुळे भराभर नारळ विकले गेले, असे कुतिन्हो म्हणाल्या.