पणजी - राज्यातील रस्त्यांवर जे खड्डे दिसतात, ते सगळे चतुर्थीपूर्वी बुजविले जातील व रस्ते सुस्थितीत आणले जातील, असे गोवा सरकारने दीड महिन्यापूर्वी जाहीर केले होते पण चतुर्थी अवघ्या सहा दिवसांवर पोहचली तरी, रस्त्यांवरील खड्डे बुजविले गेलेले नाहीत.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिपक प्रभू पाऊसकर हे विधानसभेतही बोलले होते. राज्यातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत हे त्यांनी मान्य करून चतुर्थी सणापूर्वी गोमंतकीयांना चांगले रस्ते मिळतील, असे मंत्री पाऊसकर म्हणाले होते. पाऊसकर यांना सध्या गोव्यातील काही सामाजिक कार्यकर्ते सोशल मीडियावरून त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देत आहेत. रस्त्यांवरील खड्डे सरकार अजून का बुजवत नाही असा प्रश्न लोक विचारत आहेत.
गोवा हे पर्यटन राज्य आहे. यावेळी पाऊसही खूप पडला व रस्ते खचले. रोज हजारो पर्यटक गोव्याला भेट देतात. पर्यटकांचीही वाहने रस्त्यांवरून धावतात. त्या सर्वानाच रस्त्यांची दुर्दशा पाहायला मिळते. राजधानी पणजी व परिसरातीलही भागांत रस्त्यांवर खड्डे आहेत. पणजी महापालिकेने नुकताच पुढाकार घेतला व स्वत: चे खड्डे बुजविण्यास महापालिकेने आरंभ केला. बांधकाम खात्यावर महापालिकाला विसंबून राहिली नाही. किनारी भागांमध्ये कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली. काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या किंवा अन्य विरोधी आमदारांच्या ताब्यात जे मतदारसंघ आहेत तिथे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला अजून आरंभ झालेला नाही. खड्डे बुजविण्यासाठी कळंगुट भागात इंटरलॉकिंग पेवर्सचा वापर केला जात आहे. फोंडा, डिचोली, सत्तरी, पेडणे अशा तालुक्यांमध्येही काही रस्त्यांवर खड्डे दिसून येतात.