सदगुरू पाटील/पणजी : गोव्यातील सर्व सरकारी प्राथमिक शाळा व सरकारी शाळांमध्ये पंतप्रधान व राष्ट्रपतींचे फोटो लावा, अशा प्रकारची सूचना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शिक्षण खात्याला केली होती. नोव्हेंबर महिन्यात हे फोटो लावावेत असे ठरले होते. सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्याने पंतप्रधान व राष्ट्रपतींचे फोटो सर्व शाळा पोहोचते करावे, असेही ठरले होते. मात्र सरकारी कारभार हा वेगळाच असतो. सरकारी खात्याकडून पंतप्रधान व राष्ट्रपतींचे फोटो शाळांमध्ये पोहचले नाहीत. मात्र विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून गोव्यातील सर्व शेकडो सरकारी शाळांमध्ये पंतप्रधान मोदी व राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे फोटो भिंतीवर लावले आहेत. शिक्षण संघटनांच्या सहकार्याने हे काम फत्ते करण्यात आले.
सरकारच्या प्रत्येक खात्याचा कारभार हा वरातीमागून घोडे असाच असतो. मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये एक बैठक घेऊन गोव्यातील सर्व सरकारी शाळा, सरकारी खात्यांची कार्यालये अशा ठिकाणी पंतप्रधान व राष्ट्रपतींचा फोटो लावण्याची सूचना केली होती. त्यानंतर दिवाळीची सुटी आली. माहिती व प्रसिद्धी खाते शिक्षण खात्याला फोटो उपलब्ध करून देईल व मग ते फोटो शाळांमध्ये लावता येतील असे काही अधिका-यांना वाटले होते. मात्र फोटो काही मिळाले नाहीत. शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी पुढाकार घेतला व त्यांनी शिक्षक संघटनांशी संपर्क साधला.
शिक्षक संघटनांनी पंतप्रधान व राष्ट्रपतींचे फोटो तयार करावेत व ते शाळांमध्ये लावावेत अशी सूचना भट यांनी केली. त्यानुसार शिक्षकांकडूनच मोठे फोटो उपलब्ध झाले व हे फोटो सर्व सरकारी शाळांमध्ये लागले आहेत. महात्मा गांधी, इंदिरा गांधी यांच्या फोटोंसोबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती राम नाथ कोविद यांचेही फोटो झळकत आहेत. यापुढे अनुदानित शाळांमध्येही फोटो लागतील. गोव्यात सुमारे आठशे सरकारी प्राथमिक शाळा व काही सरकारी शाळा आहेत.
माहिती खात्याने किती सरकारी खात्यांमध्ये पंतप्रधान व राष्ट्रपतींचे फोटो पोहोचविले ते कळू शकले नाही. मात्र शिक्षण खात्याशी आता माहिती खात्याने संपर्क साधून कोणत्या आकाराचे किती फोटो हवे आहेत अशी विचारणा केली. त्यावेळी आम्ही आधीच सरकारी शाळांमध्ये फोटो लावून घेतल्याचे शिक्षण खात्याने माहिती खात्याच्या संबंधित अधिका-यांना कळविले.