मडगाव: अन्नधान्य, भाजी, दूध आणि अन्य कृषी उत्पादनात गोवा राज्याला एका वर्षात स्वयंपूर्णता मिळावी यासाठी वेगवेगळ्या खात्याना एकत्रित आणून सर्वसमावेशक कृषी धोरण राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी दिली. मडगाव येथे बांधण्यात आलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांनी व्हर्चुअल उद्घाटन केले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, सध्या गोव्याला दूध, भाजी आणि इतर धान्यासाठी इतर राज्यावर अवलंबून राहावे लागते. ही परिस्थिती आम्हाला एका वर्षात बदलायची आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. शेतकऱ्याला दर वर्षी किमान 3 लाखांचे उत्पन्न मिळावे यासाठी आमचे प्रयत्न असतील असे त्यांनी सांगितले.
सध्या कृषी कार्ड निधी योजनेखाली शेतकाऱ्याव्यतिरिक्त दूध उत्पादकांना 1.60 लाखांचे बिनव्याजी कर्ज देण्यास सुरुवात केली आहे, लवकरच या योजनेचा फायदा मासेमारी आणि बागायती व्यावसायिकांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी यावेळी बोलताना गोव्यातील काजू उत्पादकांना सरकारी योजनेचा फायदा मिळावा यासाठी कृषी कार्डाची सक्ती काढून टाकल्याने सुमारे 32 हजार शेतकऱ्यांना त्याचा अतिरिक्त फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हेही उपस्थित होते.