पणजी : ‘महापौरपदाच्या कारकिर्दित प्रत्येक गोष्टीसाठी मला सरकारकडे संघर्ष करावा लागला. त्यामुळे काहीजणांकडे वाकडेपणाही पत्करावा लागला’, असे पणजी महापालिकेचे मावळते महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
फुर्तादो म्हणाले की, ‘ प्रत्येक गोष्टीसाठी मी सरकारकडे संघर्ष केला. निधी उपलब्ध नव्हता त्यामुळे वैयक्तिक संबंध वापरुन बड्या कंपन्या, बँकांकडून अनेक गोष्टी पुरस्कृत करुन घेतल्या. पुढील वर्षभराच्या कालावधीसाठी शहरातील १८ जून रस्त्याची साफसफाई साऊथ इंडियन बँकेच्या तर महात्मा गांधी मार्गाची साफसफाई विजया बँकेच्या आर्थिक साहाय्यातून होणार आहे. कचरावाहू ट्रक, गवत कापण्याची मशिने, शववाहिका आदी गोष्टी बड्या कंपन्या तसेच बँकांकडून पुरस्कृत करुन घेतल्या. गेल्या दोन वर्षांच्या काळात तब्बल ७ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या निविदा काढल्या. सांतइनेज येथील हिन्दू स्मशानभूमी, ख्रिस्ती दफनभूमी, कबरस्थानच्या नूतनीकरणासाठी १५ कोटी रुपये निधी आणला’.
ते पुढे म्हणाले की, ‘महापौरपदावरुन मी माझे कर्तृत्त्व पणजीवासीयांना दाखवले आहे. महापौरपदाचा ताबा मी घेतला तेव्हा १६ कोटी रुपये तूट होती. आज महापालिकेचे अंदाजपत्रक शिलकी बनले आहे. ३९ लाख रुपये अतिरिक्त निधी आज महापालिकेकडे आहे. याशिवाय तब्बल ५ कोटी रुपये निधी महापालिकेकडे आहे. नव्या महापौरांना काही करावे लागणार नाही’.
‘सुडा’कडून मिळालेल्या ८५ लाख रुपये निधीतून झाडे कापण्याचे मल्चर मशिन आणले. याशिवाय २५ लाख रुपये किमतीचा जेसीबी आणला. १0 हजार कचरापेट्या घराघरात मोफत वाटल्या. कचरा वाहण्यासाठी ५00 हिरव्या आणि ५00 निळ्या ट्रॉली आणल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महापालिकेसाठी ६0 कोटी रुपये खर्चाच्या नव्या इमारतीचा आराखडा तयार करुन घेतला. त्यासाठी १0 कोटी रुपयेही मिळवले. गेली २0 वर्षे मनपा इमारतीची रंगरंगोटी केलेली नव्हती. हे काम करुन घेतले. इमारतीतील वीज वाहिन्या जुन्या झाल्याने बदलण्याची गरज होती. चारवेळा शॉर्ट सर्किट होऊन थोडक्यात बजावले परंतु त्याकडे कोणी इतकी वर्षे लक्षच दिले नव्हते. या सर्व जुन्या वीज वाहिन्या बदलून घेतल्या.’ असे ते म्हणाले. एका प्रश्नावर फुर्तादो यांनी सांगितले की, ‘महापौरपदासाठी मी कधी कोणाकडे गेलो नाही आणि कोणी माझ्याकडे पाठिंबाही मागायला आले नाहीत.’
नव्या महापौर, उपमहापौरांना फुर्तादो यांनी शुभेच्छा देताना पणजीच्या विकासासाठी आपण कायम झटणार असल्याचे म्हटले आहे.