सरकार असंवेदनशील, आश्वासनांना चुना; विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 01:19 PM2019-08-27T13:19:47+5:302019-08-27T13:20:24+5:30
'पूरग्रस्तांसाठी सरकारने 48 तासात तातडीची मदत आर्थिक मदत देऊन दिलासा द्यायला हवा'
पणजी : सरकारने विधानसभेत दिलेली कोणतीही आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप करीत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी हल्लाबोल केला. चतुर्थीपूर्वी रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी करण्याचे तसेच वीज खात्याने प्रत्येक उपविभागाला ४०० वीज उपकरणे देण्याची ग्वाही दिली होती. परंतु ही आश्वासने वेशीवर टांगली गेली आहेत. चतुर्थीत लोकांनी अंधारात राहावे का, असा सवाल कामत यांनी केला.
पत्रकार परिषदेत प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या उपस्थितीत बोलताना कामत म्हणाले की, गणेश चतुर्थी तोंडावर आली आहे आणि भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. पुढील पंधरा दिवसात तरी सरकारने फलोत्पादन महामंडळाला अनुदान आणखी वाढवून देऊन लोकांना स्वस्त दरात भाज्या उपलब्ध कराव्यात. खांडेपार येथे अलीकडे जलवाहिन्या कुठून फोंडा आणि तिसवाडी या तालुक्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागले, याची गंभीर दखल काँग्रेसने घेतली असून राज्यातील पूल, साकव तसेच जलवाहिन्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी मागणी केली आहे.
ते म्हणाले की, कुठली जलवाहिनी कुठून कुठे जाते, कुठे पाणी पुरवले जाते याचे कोणतेही नकाशे सरकारकडे उपलब्ध नाहीत ते आधी तयार केले जावेत. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास पणजी सारख्या राजधानी शहरासाठी जलाशय नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या सरकारला कोणतेही सामाजिक भान राहिले नाही, असा आरोप करताना कामत म्हणाले की जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी आठ ते दहा दिवस लागावी ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
विरोधी पक्ष म्हणून आम्ही समाजाची निगडी निगडीत प्रश्न विधानसभेत उपस्थित केले होते त्याची उत्तरे त्यावेळी मंत्री देत असतात आणि वेळ मारून देत असतात परंतु ही आश्वासने पाळली जात नाहीत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. एलईडी दिवे दिलेले नाहीत, त्यामुळे अंधारात रहावे लागेल चतुर्थी काळात लोकांनी या समस्यांना सामोरे जावे काय, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
काँग्रेस सरकार सत्तेवर असताना गावाात पिकप, ट्रकमधून स्वस्त दरात भाज्या पुरविल्या जात असत. या मोहिमेचे काय झाले किती पिकप गावागावात जातात, असा सवाल त्यांनी केला राज्यात भाज्यांचे दर आणि कडधान्याचे दर गगनाला भिडले आहेत याची जंत्रीच देऊन ते म्हणाले की, मडगावच्या बाजारात आज तूर डाळ 110 रुपये किलो, चणाडाळ 110 रुपये, उडीद डाळ 90 रुपये किलो, चणे 80 रुपये किलो तर भाज्यांमध्ये ढब्बू मिरची, भेंडी प्रत्येकी 80 रुपये किलो, गाजर 100 रुपये किलो असे दर आहेत हे दर पुढील पंधरा दिवसात आणखी वाढणार आहेत चतुर्थी काळात लोकांना दिलासा देण्याकरिता सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत का, असा सवाल कामत यांनी केला. लोकांना भाज्या-फळे गत सालच्या दरानुसार मिळायला हवीत .यासाठी सरकारने अनुदान वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, राज्यात डेंग्युची प्रकरणे वाढली आहेत त्याबद्दल चिंता व्यक्त करताना कामत म्हणाले की, गोमेकॉ इस्पितळात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. डेंग्यूचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना करायला हव्यात. पूरग्रस्तांसाठी सरकारने 48 तासात तातडीची मदत आर्थिक मदत देऊन दिलासा द्यायला हवा अशी मागणीही कामत यांनी यावेळी केली.