नारायण गावस
पणजी :ग्रामीण मित्र उपक्रमाचा शुभारंभ हा ग्रामीण आणि शहरी गोव्यातील दरी कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या आणि सामाजिक - आर्थिक विकासाला चालना देणारी माहिती आणि संधी आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि जनसंपर्क विभागाने दोनापवल येथील दरबार हॉलमध्ये आयोजित केलेल्या ग्रामीण मित्र या कार्यक्रमाचे उद्यघाटन त्यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाला केंद्रीय बंदर, जलवाहतूक आणि पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, गोवा सरकारचे मुख्य सचिव डॉ. पुनीत कुमार गोयल, एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीएससी ई – प्रशासन सेवा लिमिटेड संजय कुमार राकेश, माहिती आणि तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि जनसंपर्क सचिव संजीव आहुजा आणि माहिती आणि तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि जनसंपर्क संचालक सुनील अन्चीपका हे कार्यक्रमाला उपस्थित होते.
ग्रामीण मित्र हा गोवा सरकारने ग्रामीण डिजिटल सशक्तीकरण आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी सुरू केलेला महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. धोरणात्मक भागीदारी आणि उपक्रमांद्वारे, राज्यभरातील ग्रामीण समुदायांना तंत्रज्ञान, डिजिटल साक्षरता आणि ई - प्रशासन सेवांमध्ये प्रवेश प्रदान करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे एकूणच सामाजिक - आर्थिक विकासाला गती मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या ग्रामीण मित्रांचे चांगले कार्य पाहून सरकारने त्यांना ५ हजार रुपये प्रती महिना देण्याचे ठरविले आहे. यासाठी त्यांना महिन्याल २०० जणांना सेवा देणे गरजेचे आहे. तसेच त्यांना त्यांचे कार्यालय घालण्यासाठी गोवा आर्थिक विकास महामंडळाकडून २ लाख रुपये कर्ज २ टक्के व्याजदरावर देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ग्रामीण मित्र उपक्रम हे डिजिटल पहिले राज्य साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि त्याचे यश सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आमच्या भागीदारांसोबत जवळून काम करण्यास वचनबद्ध आहोत. हा कार्यक्रम आम्हाला ई – प्रशासन सेवांच्या वितरणास गती देण्यास मदत करेल, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे म्हणाले.