पणजी : एका बाजूने पाणीपट्टीत वाढ आणि दुसऱ्या बाजूने वीज दरवाढ, असे शॉक देणे सरकारने सुरूच ठेवले आहे. सोमवारी राजपत्रात सरकारने अधिसूचना प्रसिद्ध करून घरगुती व व्यावसायिक वापरासाठी नवी वीज दरवाढ जाहीर केली आहे.यापूर्वी साधारणत: १२ टक्के वीज दरवाढ झालेली आहे. त्याविषयीची अधिसूचना अजून जारी झालेली नाही. तथापि, त्या दरवाढीव्यतिरिक्त आता नव्या दरवाढीबाबतची अधिसूचना जारी झाली आहे. संयुक्त वीज नियमन आयोगाच्या निर्णयानुसार मुख्य वीज अभियंता एस. लक्ष्मणन यांच्या सहीने अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक वापराच्या विजेचे नवे दर कसे असतील, हे स्पष्ट करण्यात आले आहे.कमी दाबाच्या पुरवठ्यासाठी घरगुती वापराच्या विजेवर पहिल्या ६० युनिटसाठी प्रति युनिट १४ पैसे दर आकारला जाईल. त्यापुढे २५० युनिटच्या वापरासाठी प्रति युनिट २१ पैसे व ५०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी प्रति युनिट ३३ पैसे दर आकारला जाणार आहे. ५०० युनिटपेक्षा जास्त विजेच्या वापरासाठी प्रति युनिट ३९ पैसे दर आकारला जाणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या विजेकरिता १०० युनिटपर्यंत प्रति युनिट ३७ पैसे आकारले जाणार आहेत. १ हजार युनिटपर्यंतच्या वापरावर ४७ पैसे व त्यापेक्षा जास्त विजेच्या वापरावर प्रति युनिट ५४ पैसे आकारले जाणार आहेत.हॉटेल व्यवसायासाठी असलेल्या विजेवर प्रति युनिट ४८ पैसे, सार्वजनिक रोषणाईसाठी ४३ पैसे, तर उच्च दाबाच्या वाहिनीद्वारे उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या विजेकरिता प्रति युनिट ५२ पैसे असा दर आकारला जाणार आहे. (खास प्रतिनिधी)
सरकारचा वीज दरवाढीचा नवा शॉक
By admin | Published: May 05, 2015 1:05 AM