पणजी : गोव्यात काँग्रेसच्या १० फुटीर आमदारांनी विधिमंडळ पक्ष भाजपात विलीन केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी असे म्हटले आहे की, 'यामुळे सरकार तर मजबूत झालेच, तसेच गोंयकारपणही राखले. काँग्रेस विधिमंडळ पक्षातील दोन तृतीयांश आमदार फुटले आणि त्यांनी भाजपात पक्ष विलीन केला आहे, अशी माहिती सावंत यांनी सभापतींकडून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'सरकार मजबूत करण्यासाठी तसेच सामान्यातल्या सामान्य गोवेकरांच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलले. मी गेले तीन महिने प्रशासन चालवत आहे. गोवेकरांना काही ठिकाणी त्रास होत होता, याची कल्पना मला होती. काँग्रेसचे आमदार आता सोबत असल्याने पूर्वीच्या घटक पक्षातील आमदारांना मंत्रिमंडळातून डच्चू देणार काय, असे विचारले असता त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे सावंत यांनी सांगितले. नव्या मंत्र्यांच्या समावेशाबद्दल किंवा शपथविधी बद्दल काहीही ठरले नसल्याचे ते म्हणाले.