पणजी : चिंबल आयटी पार्कला होणारा विरोध राजकीय स्वरुपाचा असल्याचा आरोप खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी केला. चिंबल आणि पर्वरी हे दोन्ही आयटी पार्क पर्यावरणाला कोणतीही हानी न पोचविता येतील. चिंबलचे तळे नियोजित प्रकल्पापासून ४00 मिटरवर आहे. या तळ्याला कोणतीही बाधा पोचविणार नाही तसेच दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे १0 हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार असून स्थानिकांनाच प्राधान्य दिले जाईल. पुढील दोन ते तीन महिन्यात काम प्रत्यक्ष सुरु होईल आणि १४ ते १६ महिन्यात पहिला टप्पा पूर्ण होईल, असे असे त्यांनी स्पष्ट केले.
दोन्ही ठिकाणच्या नियोजित आयटी पार्कबाबत सरकारतर्फे शुक्रवारी प्रसार माध्यमांकरिता सादरीकरण करण्यात आले. खंवटे म्हणाले की,‘ चिंबल येथे सरकारची ११५ एकर म्हणजेच सुमारे ४ लाख ६६ हजार चौरस मिटर जमीन आहे. परंतु त्यातील केवळ १0 ते १२ एकर जमीन नियोजित पार्कसाठी वापरली जाईल. ३ ब्लॉकमध्ये सात इमारती येणार असून या सर्व इमारती हरित असतील. चिंबलवासीयांन वाय फाय सेवाही मिळणार आहे. आयटीच्या क्षेत्रात गोव्याला पुढे नेण्यासाठी सरकारने धोरण तयार केले, योजनाही आणल्या. ‘व्हिस्टेआॅन तसेच अन्य आघाडीच्या कंपन्या गोव्यात आलेल्या आहेत. आयटी क्षेत्रात गोव्याबाहेर नोकरी, धंद्यासाठी जावे लागलेल्या गोमंतकीयांना परत आणता येईल. त्यांना येथेच नोकºया उपलब्ध होतील. देशात इतरत्र १५0 एकरपर्यंत जमिनीत आयटी पार्क आहेत परंतु गोव्यात जमिनींचा अभाव लक्षात घेऊन केवळ १0 ते १२ एकरमध्ये आम्ही तो उभारत आहोत.
खंवटे म्हणाले की, सरकारने चिंबल आयटी पार्कबाबत श्वेतपत्रिकाही काढली असून हा आयटी पार्क कोणत्याही प्रकारे प्रदूषणकारी नाही तसेच लागणारी वीज, पाणी याची स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. सौर ऊर्जेचा वापर होईल. पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी ‘रेन हार्वेस्टिंग’ही केले जाईल. या ठिकाणी १९ एकर जमीन खुलीच ठेवली जाईल. आयटी संबंधी एखादा हंगामी स्वरुपाचा इव्हेंट तेथे घेतला जाईल.
पर्वरी येथे केवळ ३ एकर जमिनीत आयटी पार्क येणार असून तेथे २५00 नोकऱ्यांची निर्मिती होईल. या ठिकाणी बांधकाम अद्ययावत स्वरुपाचे असेल तर चिंबलचे बांधकाम इंडो-पोर्तुगीज धर्तीवर असेल.