पणजी : माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकरांचे नाव अमर रहावे म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. विज्ञान महोत्सव हा मनोहर पर्रीकर यांनी सुरू केलेला महोत्सव गोव्यात कायम सुरू ठेवला जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले.
प्रमोद सावंत यांच्या हस्ते मनोहर पर्रीकर यांच्या समाधीची मिरामार येथे पायाभरणी करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. मनोहर पर्रीकर यांनी समाजाच्या दुर्बल घटकांचा विचार केला व त्यातूनच लोक कल्याणाच्या योजना साकारल्या. त्याचप्रमाणो मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात बुद्धीवान आणि संशोधक निर्माण व्हायला हवा असाही विचार केला व त्याच विचारामुळे गोव्यात विज्ञान महोत्सव सुरू झाला. मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा महोत्सव कायम सुरू राहील, असे प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मनोहर पर्रीकर यांनी गोव्याचा दूरदृष्टीने विचार केला व अगदी ग्रामीण भागात अत्यंत कमी लोकवस्तीच्या ठिकाणीही पूल उभे राहिले. आम्हाला मनोहर पर्रीकर यांचेच विचार पुढे न्यायचे आहेत. मनोहर पर्रीकर यांची आठवण सर्वाच्याच डोक्यात व मनातही कायम राहील. मी मुख्यमंत्रीपदी असलो तरी रोज मला मनोहर पर्रीकर यांची आठवण येते, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.
मांडवी नदीवर तिसरा पूल बांधण्याचा प्रस्ताव मनोहर पर्रीकर यांनी गोवा साधन-सुविधा विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडला तेव्हा पणजीत तिसरा पूल कशासाठी हवा आहे, अशी विचारणा त्यांना काही संचालकांनी बैठकीत केली. त्यावर तुम्हाला आता गरज कळणार नाही, पण एकदा पूल उभा राहिला की, मग तुम्हाला स्थिती कळून येईल, असे उत्तर मनोहर पर्रीकर यांनी दिले होते. आपण तेव्हा महामंडळाच्या अध्यक्षपदी होतो. आज आम्ही तिस-या मांडवी पुलामुळे पणजीत वाहतूक कोंडीची समस्या कशी कमी झाली ते पाहत आहोत. पर्यटकांसाठीही ते मोठे आकर्षण ठरले आहे, असे सावंत म्हणाले. मनोहर पर्रीकर यांनी स्पर्श केला नाही, असे एकही क्षेत्र नाही, असेही सावंत म्हणाले.
यावेळी मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल, अभिजात तसेच बंधू अवधूत उपस्थित होते. मिरामार येथे साडेसात कोटी रुपये खचरून मनोहर पर्रीकर यांची समाधी बांधली जाईल. मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीच्या बाजूलाच मनोहर पर्रीकर यांची समाधी साकारणार आहे.