लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : राज्यातील भाजप सरकार हे आपल्याच कर्मांनी पडेल. त्यासाठी काँग्रेसला काहीही करावे लागणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक यांनी पदाची सूत्रे हाती घेताना व्यक्त केली. मावळते प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी शनिवारी नाईक यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाचा ताबा दिला.या वेळी पत्रकार परिषदेत बोलताना नाईक म्हणाले की, निवडणुकीत जनाधार गमावलेले राज्यातील भाजप आघाडी सरकार हे डळमळीत झालेले आहे. आपल्याच कर्मांनी ते सरकार पडणार आहे. ते पाडण्यासाठी काँग्रेसला काहीच करावे लागणार नाही; परंतु तशी परिस्थिती आली, तर काँग्रेस सरकार स्थापनेची जबाबदारी टाळणार नाही.पक्षसंघटना मजबूत करण्यास माझे प्राधान्य असेल. केवळ बूथ पातळीवर नव्हे, तर प्रभाग पातळीवर पक्ष संघटना बळकट करण्याकडे लक्ष दिले जाईल. सदस्यत्व नोंदणी मोहीम पुन्हा सुरू केली जाईल. सर्व काँग्रेसजनांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.या वेळी मडगाव व म्हापसा शहरातील तसेच पणजीतील पक्षाच्या प्रस्तावित कार्यालयाच्या सेलडीडचे पेपर फालेरो यांनी नाईक यांना सुपुर्द केले. डिसेंबर अखेरपर्यंत पणजीत प्रशस्त इमारतीत पक्षाचे कार्यालय स्थलांतरित होणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, आमदार रवी नाईक, जेनिफर मोन्सेरात व इतर नेते या वेळी उपस्थित होते.
सरकार आपल्याच कर्मांनी पडेल!
By admin | Published: July 09, 2017 2:39 AM