लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्यातील युवक युवतींना शिकावू तत्त्वावर एक वर्ष रोजगार देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास योजनेंतर्गत १० हजार जणांना सरकारी व खासगी क्षेत्रात शिकाऊ म्हणून नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र सरकारची कौशल्य विकास योजना गोव्यात लागू केली जात आहे. इयत्ता नववी ते पदवी शिक्षण घेतलेल्यांसाठीही ही योजना लागू आहे. नववी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी दरमहा ८ हजार रुपयांपासून चढत्या क्रमाने पदवीधरांसाठी दरमहा १३ हजार रुपये, असा प्रशिक्षण भत्ता देण्यात येईल. ही नियुक्तीपत्रे केवळ १ वर्षासाठी असतील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कौशल्य विकास योजनेंतर्गत या योजनेत केवळ एक वर्षांचेच काम दिले जाणार आहे. परंतु सरकारकडून हा कार्यक्रम निरंतरपणे राबविला जाणार आहे. त्यामुळे रोजगार पोषक वातावरणाची निर्मिती होईल आणि त्याचा फायदा हा निश्चितच होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या योजनेंतर्गत सरकारी क्षेत्रात ५ हजार व खासगी क्षेत्रात ५ हजार, अशा १० हजार नियुक्त्या केल्या जातील. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. https://www.appren ticeshipindia.gov.in या वेबसाईटवर हे अर्ज करावे लागणार आहेत. आपल्या शैक्षणिक माहितीसह सविस्तरपणे अर्ज सादर करावे लागणार आहेत. जागतिक युवा कौशल्य दिनी शनिवार, दि. २४ जूनपासून अर्ज केले जाऊ शकतात. त्यांची छाननी करून यशस्वी उमेदवारांना १५ जुलै रोजी नियुक्तीपत्र दिल्या जाईल.
विद्यावेतन असे
- ५ वी ते ९ वी ८ हजार रु.- १० वी ८ हजार रु.- १२ वी : १० हजार रु.- तांत्रिक किंवा व्यावसायिक प्रमाणपत्र ११ हजार रु.- तांत्रिक व्यावसायिक डिप्लोमा : १२ हजार रु.पदवीधर १३ हजार रु.