पणजी : राज्यातील सर्व दिवंगत मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या प्रतिमा सरकार एखाद्या दालनात लावणार आहे. त्यासाठीची जागा सरकार लवकरच निश्चित करील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.
माजी मुख्यमंत्री व विद्यमान काँग्रेस आमदार प्रतापसिंग राणे यांनी याबाबतचा खासगी ठराव मांडला होता. स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर, शशिकला काकोडकर, विल्फ्रेड डिसोझा, लुईस प्रोत बाबरेझा, मनोहर पर्रीकर अशा दिवंगत मुख्यमंत्र्यांचे गोव्यासाठी योगदान आहे. त्याची आठवण म्हणून त्यांच्या मोठ्या पूर्णाकृती प्रतिमा तयार करून त्या राज्याच्या सचिवालयात लावल्या जाव्यात अशी विनंती राणे यांनी ठरावाद्वारे केली होती. मी माझी प्रतिमा लावा असे म्हणत नाही. ज्यांचे निधन झाले आहे, त्यांच्या प्रतिमा लावा अशी भूमिका राणे यांनी मांडली होती.
मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी स्वातंत्र्य सैनिकांचे व आतापर्यंतच्या सर्व आमदारांचे योगदान जनतेला कळावे म्हणून त्यांच्या प्रतिमा असलेले एखादे संग्रहालय उभे करता येईल असा मुद्दा मांडला. आपण मंत्रीपदी असताना याविषयी स्व. मनोहर पर्रीकर यांच्याशी बोललो होतो. मेरशी येथे आम्ही आरडीएची जागा घेऊन तिथे दालन उभे करूया असेही मी सूचविले होते. इतिहास लोकांसमोर यायला हवा असे ढवळीकर म्हणाले.
मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी सर्वच मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा लावूया पण सध्या फक्त पाच दिवंगत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा लावल्या जातील असे सांगितले. स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाविषयी स्वतंत्रपणो पुढे दालन करूया. तूर्त राणे यांच्या ठरावानुसार आमच्यामध्ये हयात नसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा सरकार लावील. मात्र त्यासाठी मंत्रालयात तूर्त योग्य अशी जागा नाही. आम्ही जागेचा शोध घेऊ व मग पुढील पाऊले उचलू, असे सावंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रतापसिंग राणे यांना विधानसभेचे सदस्य म्हणून 2022 साली पन्नास वर्षे पूर्ण होतील. देशातील ते अशा प्रकारचे पहिले किंवा दुसरे आमदार असतील. ते आमदार म्हणून कधीच पराभूतही झाले नाहीत. त्यांची पन्नाशी साजरी करण्यासाठी विधानसभेच्या सभागृहात एखादा कार्यक्रम आयोजित करावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी सभापती राजेश पाटणेकर यांना केली.