पणजी : गोवा सरकारने राज्यातील पर्यावरणाकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी ज्या काही महत्त्वाच्या सूचना केल्या, त्या कानावर घेण्याचीदेखील सरकारची इच्छा नाही, अशा शब्दांत आम आदमी पक्षाचे नेते सिद्धार्थ कारापूरकर यांनी सरकारवर टीका केली आहे.
कारापूरकर म्हणतात की, ‘पैसा फेकणा-यांचे हितसंबंध जपण्यासाठी सरकारने पर्यावरणाच्या बाबतीत अनेक तडजोडी केल्याने आज राज्याला नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला, मात्र त्यामुळे उद्भवलेली पूरस्थिती याला सरकारचा पर्यावरणाकडे असलेला दृष्टिकोनच जबाबदार आहे. खरेतर पर्यावरण संतुलन राखणे हे सरकारचे काम आहे, मोठ्या प्रमाणात चाललेली डोंगरकापणी, सखल भाग, शेती मातीचा भराव टाकून बुजविण्याचे प्रकार, वृक्षांची बेसुमार कत्तल यामुळे पर्यावरणीय असंतुलन निर्माण झालेले आहे.ते पुढे म्हणतात की, ‘पर्यावरणतज्ज्ञ माधवराव गाडगीळ यांनी सरकारला काही वर्षांपूर्वी सरकारला महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या, परंतु त्यांचे कोणीही कानावर घेतले नाही. केरळमध्ये मागच्यावर्षी जी आपत्ती आली त्याचेही भाकित त्यांनी आधीच केले होते.’
‘साळावलीबाबत खरी माहिती द्या’
सरकारने साळावली धरणातील पाण्याच्या ख-या पातळीबाबत लोकांना सांगावे, असे आवाहन करताना कारापूरकर म्हणतात की, ‘धरण भरले व जादा पाणी सोडावे लागले, यामुळे प्रसारमाध्यमांना जुलैमध्येच चांगले चित्र मिळाले. इतिहासात डोकावताना धरणाच्या मागील नोंदींवरून असे दिसते की ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात साळावली धरण भरते व जादा पाणी सोडावे लागते. कारण खाणीतील माती वाहून आल्याने पाण्याची साठवणूक करण्यास अडथळा येतो. राज्यातील अनेक नद्यांची हीच परिस्थिती आहे. साळावली धरण ही दक्षिण गोव्याची जीवनरेखा आहे व या धरणाच्या बाबतीतही केवळ काही जणांच्या हितसंबंधांसाठी तडजोड केली जात आहे. सरकारे बदलत राहतात; परंतु भविष्यात गोमंतकीयांनाच त्याची गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे कारापूरकर यांनी शेवटी म्हटले आहे.