पणजी : भाजपच्या सर्व मंत्री-आमदारांच्या प्रगतीबाबतचा आणि त्यांच्या मतदारसंघातील कामांबाबतचा आढावा आम्ही घेतला आहे. गेल्या दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे हळूहळू कामावर बऱ्यापैकी पकड घेत आहेत. सरकार योग्य दिशेने मार्गक्रमण करत आहे, असे संरक्षणमंत्री व ज्येष्ठ भाजप नेते मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि आमदार विष्णू वाघ यांच्या उपस्थितीत पर्रीकर म्हणाले की, भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री सतिश वेलणकर यांनी व आपण मिळून दोन दिवस आमदारांशी चर्चा केली. निवडणुकीवेळी लोकांना दिलेली आश्वासने आमदारांनी किती प्रमाणात पाळली, अजून कोणती विकासकामे होणे बाकी आहे, आमदारांसमोरील अडचणी कोणत्या आहेत व येत्या दोन वर्षांत ते काय करणार आहेत, याविषयी आम्ही आमदारांशी चर्चा केली. कारकिर्र्दीची तीन वर्षे पूर्र्ण झाल्याने अशा प्रकारे आढावा घेण्याची पद्धत आहे. पर्रीकर म्हणाले की, आपण मुख्यमंत्रिपदी असतानाच भाजपच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणे सुरू केले होते. मंत्र्यांचे प्रगती पुस्तक ही गुप्त गोष्ट आहे. ती आम्ही जाहीर करणार नाही. कुणीही मुख्यमंत्री झाल्यानंतर कामाला वेग येण्यासाठीथोडा वेळ लागतो. पार्सेकर यांच्या कामकाजाविषयी आपण समाधानी आहे. गेल्या दोन दिवसांत आम्ही राजकीय विश्लेषण केले. मात्र, पक्ष संघटनेतील बदलांविषयी चर्चा केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या तीन कल्याणकारी योजना आता पक्षाचेकार्यकर्ते लोकांपर्यंत नेतील. (खास प्रतिनिधी)
सरकारची वाटचाल योग्य दिशेने : पर्रीकर
By admin | Published: May 17, 2015 12:56 AM