पणजी : राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांचा गोव्यातील कालावधी संपल्याने येत्या शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी त्या गोव्याचा निरोप घेणार आहेत.
मृदुला सिन्हा यांची 31 ऑगस्ट 2014 रोजी गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. गोव्याच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल ठरल्या. त्यांच्यापूर्वी गोव्याला कधीच कुणी महिला राज्यपाल म्हणून लाभल्या नव्हत्या. गोव्याचे राजभवन हे अत्यंत चांगल्या जागेवर वसलेले आहे. त्या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व आहे. राजभवनमधून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसून येते. सिन्हा यांचा त्यांच्या पतीसह या राजभवनवरील काळ चांगल्या प्रकारे गेला. राजभवनला माहिती हक्क कायद्याच्या कक्षेत आणा, अशा प्रकारची मागणी घेऊन आरटीआय कार्यकर्ते आयरिश रॉड्रीग्ज यांनी दीर्घकाळ संघर्ष केला पण राजभवनने ही मागणी कधी मान्य केली नाही.
सिन्हा यांचा कार्यकाळ गेल्या ऑगस्ट महिन्यात संपला होता. केंद्र सरकारने त्यांची अन्यत्र नियुक्ती केली नाही. त्यांच्या जागी गोव्याचे राज्यपाल म्हणून सत्यपाल मलिक यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपतींनी मलिक यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. येत्या 1 रोजी श्रीमती सिन्हा गोव्याचा निरोप घेत असल्याने त्याच दिवशी मलिक गोव्यात दाखल होतील. मलिक हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. त्यांची तिथून गोव्यात गेल्या 25 रोजी बदली झाली.
सिन्हा यांच्यापूर्वी बी. व्ही. वांच्छू हे दोन वर्षे गोव्याचे राज्यपाल होते. डॉ. एस. एस. सिंधू, नागालँडचे माजी मुख्यमंत्री एस. सी. जमीर, महम्मद फजल, केदारनाथ साहनी, जे एफ आर जेकॉब आदी एकूण तिस राज्यपालांनी गोव्यात आतार्पयत सेवा बजावली. पोतरुगीजांच्या राजवटीतून डिसेंबर 1961 मध्ये गोवा मुक्त झाल्यानंतर मेजर जनरल के. पी. कँडेथ यांनी पहिले मिलिटरी राज्यपाल म्हणून गोव्यात काम केले. कँडेथ हे जून 1962 र्पयत गोव्यात होते.