पणजी: आपल्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या कामगारांचा आवाज सरकार गुन्हे नोंद करुन दाबत आहे. सरकार हुकुमशाह प्रमाणे वागत असल्याचे नमूद करुन सरकारच्या या भूमिकेविरोधात कामगारवर्गाने पणजी येथील आझाद मैदानावर निदर्शने करुन काळा दिवस पाळला.
कुठल्याही पक्षाचे सरकार आले, तरी ते कामगारांच्या हिताआडच वागते. अशा धोरणांना कामगार नेहमीच विरोध करत राहणार आहे. काही झाले तरी मागे हटणार नसल्याचेही आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आयटक नेते ॲड. राजू मंगेशकर, ॲड. प्रसन्न उटगी व अन्य हजर होते.
ॲड. मंगेशकर म्हणाले, की खासगी क्षेत्रात कामगारांना फार कमी पगार आहे. त्यातच अनेक कंपन्यांकडून व्यवस्थापन कामगारांची सतावणूक करते. परंतु त्याविरोधात आवाज उठवताच सरकार कामगारांवर गुन्हे नोंद करुन आवाज दाबत आहेत. त्यांच्यावर अन्याय करते. फार्मा क्षेत्रातील कामगारांना सुध्दा कमी पगार मिळत असून याविरोधात आंदोलनाचा इशारा देताच एस्मा लागू केला जातो. सरकार कामगार विरोधी असल्याची टीका त्यांनी केली.