लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: म्हादईसाठी आता रिव्होल्युशनरी गोवन्सकडून (आरजी) १०० किलोमीटरची पदयात्रा काढली जाणार आहे. २० ते २८ फेब्रुवारी दरम्यान ठाणे सत्तरी ते ऊसगाव अशी ही पदयात्रा होईल, अशी माहिती आरजीचे नेते मनोज परब यांनी दिली.
'कर्नाटक सरकारने कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी कर्नाटक सरकारने आपल्या अर्थसंकल्पात १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यावरून या प्रकल्पांबाबत कर्नाटक सरकार गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, गोवा सरकार हे केंद्रातील भाजप सरकारचे गुलाम झाले आहे. त्यामुळे ते म्हादईबाबत हालचाल करीत नाहीत अशी टीका परब यांनी केली.
ते म्हणाले की, 'सत्तरी तालुका हा म्हादईच्या पात्रात येतो. या तालुक्यातील लोक, शेती, जनावरे, पर्यावरण या सर्व बाबी म्हादईच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे तेथील लोकांमध्ये म्हादईबाबत जागृती करण्यासाठी ही पदयात्रा आयोजित केली आहे. यादरम्यान ठाणे सत्तरी ते ऊसगावअसे १०० किलोमीटर अंतर नऊ दिवसांत पार केले जाईल. दरदिवशी १० ते १२ किलोमीटर पदयात्रा संध्याकाळी ४:३० ते ८:३० अशी काढली. यावेळी लोकांना म्हादईचे महत्त्व पटवून दिले जाईल,' असे परब यांनी सांगितले.
पाणी टंचाईविषयी दाद मागणार : परब
सत्तरी, तसेच राज्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या भ आहे. त्यातच जर म्हादईचे पाणी वळवले, तर पाण्याची टंचाई अधिकच तीव्र होईल. अशा स्थितीत म्हादई वाचवण्यासाठी लढा देण्याची गरज आहे. या पदयात्रेदरम्यान सत्तरी तालुक्यातील ज्या गावांना पाणी समस्या भासत आहे, त्या गावांतील समस्या मिटवावी, असे निवेदन तयार करून सार्वजनिक बांधकाम खाते, तसेच संबंधित खात्यांना सादर केले जाईल, असे परब यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"