लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: म्हादई प्रश्नी प्रवाह प्राधिकरणाच्या दुसऱ्या बैठकीच्या इतिवृत्ताने राज्य सरकारला उघडे पाडल्याची टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, 'पाणी वळवल्याबद्दल कर्नाटकला प्रवाह समितीकडे 'उघडे पाडले' वगैरे जो दावा गोवा सरकार करीत त्यात कोणतेही तथ्य नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. प्रवाहच्या दुसऱ्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये एक यासंबंधी शब्दही आहे. उलट कर्नाटकने दिलेल्या आदरातिथ्याची स्तुती केली आहे.
सरदेसाई म्हणाले की, हे सरकार म्हादईबद्दल गंभीर नाहीच. म्हादई आमची जीवनदायिनी असून कर्नाटकने पाणी वळवण्याचे सत्र चालूच ठेवले असताना गोवा सरकार कोर्टात तातडीच्या सुनावणीची मागणी करत नाही. गोवा सरकारने १ कोटी ७६ लाख गोव्याने प्रवाह प्राधिकरणाला द्यावे लागतील. सरकारने हा विकत घेतलेला आजार आहे.
मंत्रिमंडळ फेररचनेच्या हालचालींबाबत बोलताना ते म्हणाले की, फेररचनेमुळे समस्या सुटणार नाही. अनेक मंत्री असे आहेत की ते खरोखरच हकालपट्टी करण्याच्या लायकीचे आहेत. आम्ही विधानसभा अधिवेशनात या मंत्र्यांना उघडे पाडले. प्रत्येकजण स्वतःच्या खात्याचा मुख्यमंत्री बनला आहे. डोंगर कापणी झाल्यास यापुढे तलाठी जबाबदार असतील, या मुख्यमंत्र्यांच्या विधानावर बोलताना ते म्हणाले की, 'हे मुख्यमंत्र्यांना आधी कळायला हवे होते.
फातोर्डा पोलिस स्थानकाची १४ रोजी पायाभरणी
फातोर्डा पोलिस स्थानक इमारतीसाठी येत्या १४ रोजी पायाभरणी होणार आहे. पोलिस क्वार्टर्स व नवीन इमारतीसाठी तीनवेळा निविदा काढल्या. आता काम सुरू होणार आहे. पायाभरणीनंतर १८ महिन्यांत इमारत पूर्ण होणार आहे. फातोर्डा येथे स्वतंत्र वाहतूक विभाग, महिला पोलिस स्थानकासाठीही प्रयत्न चालू आहेत.