पणजी : गोव्याचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचा पुत्र रेमंड याच्याविरुध्द बोगस बीए पदवी प्रमाणपत्र प्रकरणात चौकशीचे आदेश राज्यपालांनी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. रेमंड याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाई केली जावी, अशी मागणी समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी गेल्या आठवड्यात राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन केली होती.
रेमंड याने सादर केलेली बीए पदवी बोगस असल्याचे आढळून आल्यानंतर उत्तर गोवा जिल्हाधिकाºयांनी १६ जून रोजी त्याची अव्वल कारकुनपदासाठी झालेली निवड रद्द केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकुनपदाच्या १६ जागांसाठी जी निवड झाली होती त्यात रेमंड याचा समावेश होता. उर्वरित १५ जणांना २७ मे रोजी रुजू करुन घेण्यात आले. बोगस पदवी प्रकरणात त्याच्याविरोधात अजून एफआयआर नोंद झालेला नाही, याकडे राज्यपालांचे लक्ष वेधण्यात आले होते.
बोगस विद्यापीठाची बीए पदवी सादर केल्याचे निरीक्षण गोवा विद्यापीठाने नोंदविले होते. लखनौस्थित ज्या भारतीय शिक्षा परिषद विद्यापीठाची बीए पदवी रेमंड यांनी सादर केली आहे ते विद्यापीठ बोगस असल्याचे आढळून आल्याचे म्हटले होते. या सर्व प्रकरणात रेमंड हायकोर्टात गेला होता. परंतु कोर्टानेही त्याला अंतरिम दिलासा नाकारला.
दरम्यान , रेमंडविरुध्द कठोर कारवाई केल्यास इतरांनाही संदेश जाईल आणि भविष्यात शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या बाबतीत खोटारडेपणा करण्याचे किंवा बोगस प्रमाणपत्रे सादर करण्याचे धाडस कोणी करणार नाही, असे आयरिश यांचे म्हणणे आहे. नोकर भरतीच्यावेळी उमेदवार शैक्षणिक पात्रता किंवा अन्य जी प्रमाणपत्रे सादर करतात त्याची सत्यता पडताळण्याची गरज आहे. सरकारने त्यासाठी विशेष उपाययोजना करायला हव्यात आणि रेमंड त्याने जे कृत्य केले त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता घ्यायला हवी, असे आयरिश यांनी म्हटले आहे.