सदगुरू पाटील
पणजी : मुख्यमंत्री कोण बनावा याविषयी गोव्यातील भाजपमध्ये अजून वाद आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अजुनही त्यावर तोडगा काढलेला नाही व त्यामुळे गोव्यात सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया अडली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवसांचा कालावधी उलटला तरी देखील सरकार स्थापन होत नसल्याने गोमंतकीयांचे लक्ष आता राज्यपालांच्या भूमिकेकडे लागून राहिले आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल गेल्या १० रोजी लागला. विधानसभेच्या चाळीसपैकी वीस जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र भाजपने अजून देखील राजभवनवर जाऊन सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. दोन आमदार असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने तसेच तिघा अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ भाजपकडे आहे. मात्र मुख्यमंत्री कुणी व्हावे, भाजपचा विधिमंडळ गट नेता कोण असेल हे अजून ठरत नाही. आमदारांचा एक मोठा गट काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वासोबत आहे. काही आमदार मात्र विश्वजित राणे यांना पाठिंबा देत आहेत. राणे हेही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. राणे यांनी जाहीरपणे आपली इच्छा व्यक्त केली नाही पण मुख्यमंत्री कोण व्हावे याबाबतचा निर्णय भाजपचे श्रेष्ठी घेतील अशी भूमिका विश्वजित यांनी मांडली आहे. विश्वजित हे ज्येष्ठ आमदार असून त्यांची पत्नी दिव्या राणे ही पूर्ण गोव्यात सर्वाधिक मताधिक्क्य घेऊन निवडून आली आहे. विश्वजित हे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांचे पुत्र आहेत.
सरकार स्थापन होत नसल्याने विरोधी काँग्रेस पक्षाचे नेते दिगंबर कामत, मायकल लोबो, कार्लुस फरैरा यांनी काल शुक्रवारी चिंता व्यक्त केली. राज्यात यापूर्वी असे कधी घडलेले नाही. राज्याला अधांतरी ठेवणे हे राज्याच्या हिताचे नाही. राज्यपालांनी या विषयात हस्तक्षेप करण्याची गरज आहे असे लोबो व अन्य विरोधी आमदारांचे म्हणणे आहे.
गोव्यात भाजपला ३ लाख १६ हजार मते मिळाली तर, बिगरभाजप उमेदवारांना एकूण साडेसहा लाख मते प्राप्त झाली आहेत. ६६ टक्के मते भाजपविरोधी आहेत यावरही काँग्रेसने बोट ठेवले आहे. दरम्यान, भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा नाही असा दावा काळजीवाहू मुख्यमंत्री सावंत यांनी केला. सावंत तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. गोव्यात सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया दि. २१ नंतर सुरू करता येईल असे केंद्रीय नेतृत्वाने गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याची माहिती मिळाली. भाजपच्या आमदारांमध्ये सध्या मंत्रीपद मिळविण्यासाठी स्पर्धा लागली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय निरीक्षक बनून नरेंद्रसिंग तोमर येत्या आठवड्यात गोवा भेटीवर येणार आहेत.
प्रमोद सावंत यांनाच दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळेल असे भाजपच्या बहुतेक आमदारांना वाटते. देवेंद्र फडणवीस यांच्या मते गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा नेता कोण असेल याची घोषणा पक्षश्रेष्ठींच्या स्तरावरून होणार आहे.