पणजीः भरमसाट रुपये शुल्क आकारून नोकरीची हमी देणारे विविध अभ्यासक्रम शिकविणाऱ्या राज्यातील खाजगी शिक्षण संस्था सरकारच्या स्कॅनरवर आल्या आहेत. अशा संस्थआंकडून फसवणुकीच्या तक्रारी गोव्यातील अनेक युवक युवतींकडून आल्यामुळे अशा संस्थांची चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिला आहे.
अमुक लाख रुपये पगाराची हमी असलेले हे कोर्स करा आणि ते कोर्स करा अशी आमिषे दाखवून लाखो रुपये घेऊन चालणाऱ्या खाजगी संस्थांच्या सत्यतेबद्दल शंका निर्माण झाली आहे. कारण असे महागडे अभ्यासक्रम करूनही अनेक युवक युवतींना रोजगार मिळाला नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा युवक युवतींकडून सरकारकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यात कोणकोणत्या संस्था किती पैसे शुल्क आकारून कोणते अभ्यासक्रम शिकविता याची. सविस्तर माहिती आहे. या संस्थआंची नावे सरकारने शिक्षण खात्याला सुपूर्द केली आहे. शिक्षण खात्याला या संस्थांची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. तसेच बोगस संस्था किंवा लोकांची फसवणूक करणाऱ्या संस्था सापडल्यास त्यांच्यावर कांयदेशीर कारवाई करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. तसेच अनेक मान्यता नसलेल्या खाजगी संस्थाही विविध अभ्यासक्रम शिकवित असल्याचे आढळून आले आहे.
मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी युवकांना अभ्यासक्रम आणि संस्था निवडताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. सबंधित संस्था मान्यताप्राप्त आहे का आणि त्या संस्थेला सबंधित अभ्यासक्रम सुरू करण्यास गोव्यात परवानगी आहे काय या बद्दल माहिती घेऊनच प्रवेश घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.