पणजी : राज्यातील ग्रामपंचायतींसाठी विकास आराखडा तथा योजना येत्या 2 ऑक्टोबरपासून तयार केली जाणार आहे. लोकांच्या सहभागाने ही योजना तयार व्हावी या हेतूने सरकारने येत्या 29 व 30 रोजी दोन दिवस उत्तर व दक्षिण गोव्यातील पंचायतींचे सरपंच, महिला पंच सदस्य तसेच पंचायत सचिव यांची बैठक बोलावली आहे.
पंचायत संचालक अजित पंचवाडकर यांनी याविषयीची माहिती मंगळवारी येथे जाहीर केली आहे. विकासकामे, शिक्षण, आरोग्य, मलनिस्सारण, पिण्याचे पाणी, गरिबी निर्मूलन, सरकारी योजना अंमलात आणणो अशा विविध उपक्रमांसाठी एक आराखडा तयार करावा लागतो. वर्षभर कोणते उपक्रम राबविले जातील त्याची यादी आराखड्यात तथा योजनेत असावी लागते. योजना तयार करण्यासाठी लोकांचा सक्रिय सहभाग यावर्षी अपेक्षित आहे. ग्रामसभेसमोर ही योजना मांडली जाणार आहे. तत्पूर्वी ही योजना लोकांना दाखविली जाईल.
सरपंच, ग्रामविकास समिती संयोजक, महिला पंच सदस्य व पंचायत सचिवांना या आराखड्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी बैठक तथा कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा उत्तर गोवा जिल्ह्यासाठी येत्या 29 रोजी ताळगाव येथील कम्युनिटी सभागृहात होणार आहे. दक्षिण गोवा जिल्ह्यासाठी अशी कार्यशाळा 30 रोजी मडगाव येथील स्व. माथानी साल्ढाळा प्रशासकीय संकुलाच्या परिषदगृहात होईल. ग्रामपंचायत विकास आराखडय़ाबाबत या कार्यशाळेत जागृती केली जाईल. आराखडा तयार करण्यापूर्वी कृती आराखडा तयार केला जाईल. 2 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत पंचायत विकास आराखडा तयार होईल, असे अपेक्षित आहे.