लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: विधानसभेचे पावसाळी अधिवेशन चालू असतानाच रविवारी राज्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या विषयांवरुन ग्रामसभाही तापल्या. दक्षिणेत सनबर्नला विरोध चालूच असून काल बेतालभाटी व नुवें ग्रामसभेतही ठराव घेण्यात आले.
उत्तर गोव्यात कोरगाव पंचायतीमध्ये बेकायदा डोंगर कापणी तसेच व्हिल्ला बांधकामास विरोध करणारा ठराव घेण्यात आला. मयें ग्रामसभेत गोशाळेचा विषय तापला तर सावर्डेच्या ग्रामसभेत बंधाऱ्याला विरोध करण्यात आला. अन्य ठिकाणीही ग्रामसभा तापल्या.
रोमी कोंकणीलाही समान दर्जा द्यावा, या मागणीवरुनही दक्षिणेतील ग्रामसभांमध्ये ठराव घेतले जाऊ लागले आहेत. काल वार्का ग्रामसभेतही असाच ठराव घेण्यात आला. बेताळभाटी ग्रामसभेने प्रस्तावित सनबर्न इलेक्ट्रॉनिक नृत्य संगीत महोत्सवाला विरोध करण्याचा ग्रामसभेने रविवारी एकमताने निर्णय घेतला. दक्षिण गोव्यात सनबर्न फेस्टिव्हलचे आयोजन केल्यास कचरा निर्मिती, वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न, ड्रग्ज, वेश्या व्यवसाय आणि इतर वाईट गोष्टींना वाव मिळेल, अशी भीती ग्रामसभा सदस्यांनी ग्रामसभेत व्यक्त केली. महोत्सवामुळे दक्षिण गोव्याच्या समाजासाठी आणि पर्यावरणासाठी अप्रत्यक्षपणे अशा दुष्कृत्यांना प्रोत्साहन मिळेल, असा आरोप ग्रामस्थांनी केला.
नुवे ग्रामसभेत रोमी लिपीला देवनागरीबरोबर समान दर्जा, सनबर्नला दक्षिण गोव्यात विरोध, गावातील भू परिवर्तनाला विरोध असे महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. वार्का ग्रामसभेत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी विशेष प्राणी जन्म नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत पंच, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रतिनिधींचा समावेशअसेल.
मोरजी ग्रामसभेमध्ये मोरजी पंचायत क्षेत्रातील टेंबवाडा किनारी भागातील सरकार उभारत असलेल्या उद्यान प्रकल्पांना ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. येथील पार्किंग व्यवस्थाही नव्या पद्धतीने करु नये, डोंगर माळरानावरील जमीनीचा वाद संपुष्टात येत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे परवाने देऊ नये आदी मागणी करणारे ठराव ग्रामसभेमध्ये मंजूर करण्यात आले.
धोकादायक पंचायत घराचा प्रश्न...
शेल्डे ग्रामसभेत जुन्या पंचायत घराच्या धोकादायक स्थितीबद्दल लक्ष वेधण्यात आले, तसेच तिळामळ मैदानाची ८ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा पाहणी करण्याचे ठरले. पंचायतीने महसुलाचे स्रोत वाढविण्यासाठी इतर करांसह घरपट्टीचे पुनर्मूल्यांकन करण्याचा एकमताने ठराव, दीनदयाळ योजनेंतर्गत नवीन पंचायत घर बांधण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
सभा तहकूब
वेरे-वाघुर्मे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत आगाऊ देण्यात आलेल्या प्रश्नांची सरपंच शोभा पेरणी या योग्य उत्तरे देऊ न शकल्याने ग्रामसभा अर्ध्यावरच तहकूब करण्यात आली. ही ग्रामसभा पुढील रविवारी घेण्याचे ठरले. ग्रामसभेत ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे ३५ प्रश्न दिले होते.त्यापैकी जेमतेम ८ प्रश्नांवर दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत चर्चा झाली.
रस्त्यांच्या दुर्दशेबाबत कोर्टात जाणार
आसगाव पंचायत क्षेत्रातील रस्त्याच्या दुर्दशेला जबाबदार धरून वीज खाते व सार्वजनिक बांधकाम खाते (रस्ते विभाग) यांच्याविरोधात कोर्टात जाणार असल्याची माहिती आसगाव पंचायतीचे सरपंच हनुमंत नाईक यांनी पंचायतीच्या सर्वसाधारण सभेत दिली. रविवारी ही ग्रामसभा झाली. गावातील रस्त्याच्या दुर्दशेस कारणीभूत असलेल्या कंत्राटदारांना कळ्ळ्या यादीत टाकावे, असे कोर्टाच्या अर्जात नमूद करावे असेही काही ग्रामस्थांनी सुचवले.
बंधाऱ्याला विरोध
सावर्डेच्या ग्रामसभेत मिराबाग परिसरात राहणाऱ्या स्थानिकांनी जुवारी नदीवर बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याला विरोध केला. जुवारी नदीवर बांधण्यात येणाऱ्या या बंधाऱ्याबाबत मीराबागच्या रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थांनी सरपंचांना प्रकल्पाच्या परिणामांबाबत प्रश्नांची सरबत्ती केली.
गोशाळेबाबत चर्चा
मये पंचायतीच्या ग्रामसभेत सिकेरी येथील गोसाळेचा विषय तापला. गोशाळेमुळे प्रदूषण होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. यावेळी गोसेवक महासंघाचे कमलाकांत तारी यांनी गोशाळेच्यावतीने प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे ग्रामसभेत स्पष्ट केले.