मडगाव- प्रखर राष्ट्रवादी टी.बी. कुन्हा यांचा जन्म झालेले मिनेडिस ब्रागांझा यांचे पुरातन घर, 17 व्या शतकातील पुरातन चॅपल, गॉथिक शैलीचा देखणा क्रॉस. एवढेच नव्हे तर इतर पुरातन स्मारके यांचा सांभाळ करण्यासाठी चांदर या गावातून जाणारा राज्य हमरस्ता रद्द करावा यासाठी चांदरवासीय एकत्र आले आहेत.
चांदर हा गाव दक्षिण गोव्याचे मुख्यालय असलेल्या मडगावपासून 8 कि.मी. अंतरावर असून एकेकाळी ही जागा कदंब राज्याची राजधानी होती. या गावात अजुनही पुरातन स्मारके अबाधित असून कित्येक आलिशान हेरिटेज महत्व असलेल्या घरांसाठीही हा गाव प्रसिध्द आहे. याच गावातून राज्य सरकारचा राज्य हमरस्ता 8 जात असल्याने रस्ता रुंदीकरणात ही पुरातन वारशाची स्थळे धोक्यात येतील अशी स्थानिकांमध्ये भिती आहे.
गुरुवारी या गावच्या सरपंच सेलिना फुर्तादो यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांची भेट घेऊन राज्य हमरस्त्याचा प्रस्ताव मोडीत काढावा अशी मागणी केली. यासंबंधी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढू असे आश्र्वासन यावेळी सरदेसाई यांनी या शिष्टमंडळाला दिले.
मुख्य नगरनियोजक पुत्तूराजू यांच्या दाव्याप्रमाणो 2021 च्या प्रस्ताविक प्रादेशिक आराखडय़ात चांदरचा हा रस्ता राज्य हमरस्ता म्हणून आखला गेला आहे. 2001 च्या आराखडय़ानुसार हा नवीन आराखडा तयार केल्याचा त्यांचा दावा होता. मात्र 2001 च्या आराखडय़ात चांदरचा हा रस्ता अंतर्गत जिल्हामार्ग म्हणून दाखविण्यात आला आहे. मुख्य नगरनियोजकांनी जाणुनबुजून चुकीचा आराखडा तयार केल्याचा आरोप यावेळी या शिष्टमंडळाने केला. आपला दावा सिध्द करण्यासाठी जुन्या आराखडय़ाच्या प्रतीही त्यांनी नगरनियोजन मंत्र्यांना दाखविल्या. गोव्यातील पुरातन वारसा आम्ही धोक्यात येऊ देणार नाही असे यावेळी सरदेसाई यांनी सांगितले.