नारायण गावस, वाळपई : अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदीर प्रतिष्ठापनेचा देशभर उत्सव साजरा केला जाणार असून त्याचाच भाग म्हणून सत्तरी आणि उसगावात सर्वात मोठी दिवाळी लाोकांना पहायला मिळणार, असे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे म्हणाले. आज रविवारी मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते सत्तरीतील काही घरांमध्ये श्रीरामाचे फोटो असलेले भगवे ध्वज देण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा पंचायत सदस्या देवयानी गावस, तसेच भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. सत्तरीतील घराघरांवर श्रीरामाचे भगवे ध्वज
श्री राम मंदिराच्या उद्घाटनाला सर्व देशभर दिवाळी साजरी केली जाणार आहे. राज्यातही या दिवशी मोठा उत्सव असणार आहे. पण सर्वात मोठी दिवाळी राज्यातील लोकांना सत्तरी आणि उसगावामध्ये पाहायला मिळणार आहे. आम्ही सत्तरीतील आणि उसगावातील प्रत्येक घराघरामध्ये श्रीरामाचे फोटो असलेले भगवे ध्वज दिले आहेत. हे भगवे ध्वज प्रत्येक घराघरांवर लावले जाणार आहेत. तसेच सत्तरीतील सर्व मंदिरामध्ये हे ध्वज लावले जाणार आहेत. आमच्या कार्यकर्त्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून या ध्वजांचे सर्वांना वाटप केले जात आहे. तसेच या दिवशी सर्व मंदिरामध्ये पूजाअर्चा आरती असणार आहे. सर्व धार्मिक स्थळांवर हा दिवस मोठ्या उत्सहात साजरा होणार आहे, असेही मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
मंत्री राणेंकडून घरोघरी जाऊन ध्वज भेट
मंत्री विश्वजीत राणे यांनी दुपारच्या वेळी पायी चप्पल न घालता तासभर चालत काही जणांच्या घरी जाऊन घरातील ज्येष्ट नागरिकांना श्रीरामाचे ध्वज दिले. यावेळी त्यांनी लोकांना घरावर हे ध्वज लावण्यास सांगितले. तसेच घराघरात या दिवशी दिवे लावून दिवाळी साजरी करण्यास सांगितले. तसेच त्यांनी या ज्येष्ट नागरिकांकडून आशीर्वाद घेतला. सध्या पर्ये मतदार संघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे तसेच मंत्री विश्वजीत राणे श्रीरामाच्या मंदिर उद्घाटनाचा सत्तरीतील गावागावात जाऊन प्रचार प्रसार करत आहेत.
श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना निमित्त वाळपई आणि उसगावामध्ये श्रीरामाची ७० बाय ३० आकाराची मोठी रांगोळी काढण्यात आली आहे. ही रांगोळी सध्या सर्वांचे आकर्षण ठरत आहे. अनेक लोक ही रांगोळी पाहायला येत आहेत. तसेच सर्व मंदिरामध्ये अशा प्रकाराची रांगोळी काढली जात आहे.