पणजी : विज्ञान परिषद-गोवातर्फे आयोजित तिस-या भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाला आजपासून येथे सुरुवात झाली. या महोत्सवाचे उद्घाटन दिल्ली येथील एनएमआर, एआयआयएमएस विभागाच्या प्राध्यापिक डॉ. रमा जयसुंदर यांच्या हस्ते झाले. यावेळी गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक, धेंपो ग्रुपचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, राष्ट्रीय आयोजक समितीचे सचिव जयंत सहस्त्रबुद्धे, विजनाना भारती, एनआयओ संचालक प्रा. सुनील कुमार सिंग, विज्ञान परिषद गोवाचे अध्यक्ष सुहास गोडसे, उपाध्यक्ष आय. के. पै. उपस्थित होते.१९ पर्यंत रोज सकाळी १० ते संध्या ५ वाजेपर्यंत हा महोत्सव असेल. उद्घाटनप्रसंगी डॉ. रमा जयसुंदर म्हणाल्या की, गोव्यात अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन होणे आणि त्याचा साक्षीदार बनणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. मी आयोजकांचे अभिनंदन करते. खूप मेहनत करून हा महोत्सव आयोजित केला आहे. अशा प्रकारच्या महोत्सवामुळे केवळ विद्यार्थ्यांनाच विज्ञान शिकण्याची प्रेरणा मिळत नाही तर महोत्सवात सहभागी होणा-या सर्वांना बरेच काही शिकायला मिळते. विज्ञान विषयावरील चित्रपटांच्या स्पर्धेतून गोव्यातील कुशाग्र विद्यार्थ्यांनी बनवलेले चित्रपटही पाहायला मिळतील.राजेंद्र तालक म्हणाले की, गोवा हे इफ्फीसारख्या मोठ्या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करते. इफ्फी ५० वे सुवर्ण महोत्सवी वर्ष २०१९ मध्ये साजरे करणार आहे. हा चित्रपट महोत्सव राष्ट्रीय पातळीवर आयोजित व्हावा, यासाठीही उत्सुक आहोत. विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेऊन दर्जेदार चित्रपट बनवले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. धेंपो ग्रुपचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी सांगितले की, चित्रपटातून विज्ञान शिकणे हा उत्तम मार्ग आहे. युवकांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी असे महोत्सव खूप फायदेशीर ठरतात. विज्ञान परिषद गोवा यांनी विद्यार्थ्यांनी खूप चांगला पर्याय निवडला आहे. त्यातून देशाच्या विकासासाठी योगदान मिळेल.विज्ञान परिषद-गोवाचे अध्यक्ष सुहास गोडसे म्हणाले, की चित्रपटाद्वारे विज्ञानाला चालना देण्याासाठी आयोजित केलेला हा महोत्सव आहे. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही या महोत्सवातून विविध उपक्रम राबवित असतो. त्यात कार्यशाळा, परिसंवाद, संशोधकांसोबत चर्चा, चित्रपट इतर कार्यक्रमांचा समावेश असतो. मी साय-इफ्फीचा आभारी आहे. राष्ट्रीय आयोजन समितीचे सचिव जयंत सहस्त्रबुद्धे म्हणाले की, भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाच्या मदतीने तिसरा चित्रपट महोत्सव आयोजित करीत आहोत, याबद्दल खूप अभिमान वाटतो.एनआयओचे संचालक प्राध्यापक सुनील कुमार सिंग म्हणाले की, विज्ञान चित्रपट महोत्सव ही आगळीवेगळी कल्पना आहे. विद्यार्थ्यांना आणि युवकांना विज्ञानाप्रती सजग करण्यास मदत मिळते. त्त्यांना शिकण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे.लघुपट निर्मिती स्पर्धा आणि बक्षिसेयंदा या चित्रपट महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे विज्ञानाधारित चित्रपट निर्मितीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या. पाच मिनिटांहून अधिक अवधीच्या गटात द फॉरगॉटन फॉरेस्ट ला सर्वोत्कृष्ट लघू म्हणून निवडण्यात आले. स्कूल विदाउट वॉल्सला दुसरे बक्षिस मिळाले. पाच मिनिटांपेक्षा कमी वेळेच्या गटातील सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून द इअर-२११८ ची निवड करण्यात आली. याच गटात कॅट इन द बॉक्स हा दुसरा तर विस्डम टूथ हा तिसरा लघुपट ठरला. उद्घाटन सोहळ्याला विविध शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थित होती. इतर गटातील पुरस्कारांचे वितरण १९ रोजी समारोप कार्यक्रमात करण्यात येईल.हॉलिवूडचे विज्ञानावर आधारित सात व भारतीय एक मिळून आठ चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित केले जातील. गोव्यासह शेजारी सिंधुदुर्गमधील मिळून १0 हजारांहून अधिक विद्यार्थी याचा लाभ घेतील. तालक म्हणाले की, २0१६ साली हा चित्रपट महोत्सव सुरु झाला तेव्हा ६९ विद्यालयांमधून ५ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. संशोधक व निर्माते यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी चांगले व्यासपीठ महोत्सवानिमित्त उपलब्ध झाले आहे.असे आहेत विज्ञान चित्रपट !अॅड्रोमेडा स्ट्रेन ( थ्रिलर), आइस एज : कोलिजन कोर्स (अॅनिमेशन, अॅडव्हेंचर), २0१0 (अॅडव्हेंचर), लाइफ (थ्रिलर, हॉरर), अॅरायव्हल (ड्रामा), कोअर (अॅक्शन, अॅडव्हेंचर), अॅबिस (१९८९) (अॅडव्हेंचर) हे अमेरिकेचे तर २४ हा भारतीय तामीळ चित्रपटही प्रदर्शित केला जाणार आहे. आयनॉक्स १ व आयनॉक्स २ या स्क्रीनवर हे चित्रपट प्रदर्शित केले जातील. ५ शास्रज्ञ यावेळी उपस्थित असतील. तसेच पुणे येथील एनसीसीएसचे शेखर पांडे व इतरांची खास उपस्थिती असेल. मालवण येथून काही विद्यार्थी या चित्रपट महोत्सवात भाग घेतील तसेच निपाणी येथून काही शिक्षकही येतील, असे सांगण्यात आले.
गोव्यात विज्ञान चित्रपट महोत्सवाला शानदार प्रारंभ, शाळकरी विद्यार्थ्यांनी घेतला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 9:41 PM