मडगाव - काँग्रेसचे माजी मंत्री आणि कुंकळ्ळीचे माजी आमदार ज्योकी आलेमाव आणि त्यांचे पुत्र युरी आलेमाव यांच्या काँग्रेस पुनरप्रवेशाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मान्यता दिली असून उद्या शनिवारी (21 नोव्हेंबर) ते काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
गोव्याचे काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी एका ट्विट मधून ही बातमी दिली आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी या घोषणेचे स्वागत केले आहे. आलेमाव पिता पुत्राला काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश मिळावा यासाठी कामत यांनीच विशेष प्रयत्न केले होते.
आपल्या काँग्रेस पक्षातील प्रवेशासंबंधी बोलताना आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करावा ही कुंकळ्ळी मतदारसंघातील लोकांची इच्छा होती. आम्हाला काँग्रेस पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आम्ही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, गोव्याचे प्रभारी दिनेश राव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व अन्य नेत्यांचे आभारी आहोत अशी प्रतिक्रिया युरी आलेमाव यांनी व्यक्त केली.
ज्योकी आलेमाव हे काँग्रेसच्या उमेदवारीवर कुंकळ्ळीतून दोनवेळा जिंकून आले होते. ते काँग्रेस सरकारात मंत्रीही होते. मात्र 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून अपक्ष म्हणून या मतदारसंघातून निवडणूक लढवीली होती. तर त्यांचे पुत्र युरी आलेमाव यांनी 2012 मध्ये सांगे मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाच्या उमेद्वारीवर निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. दोन वर्षांपूर्वी त्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश घेतला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी हा पक्ष सोडला.
मिळत असलेल्या माहितीप्रमाणे युरी याना काँग्रेसने कुंकळ्ळीची उमेदवारी देण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात आलेमाव याना विचारले असता पक्ष जे काय काम देईल ते मी करणार असे ते म्हणाले. कुंकळ्ळी मतदारसंघाबरोबर मी सांगे मतदारसंघातही काँग्रेससाठी काम करणार असून माझे अजूनही त्या मतदारसंघात कार्यकर्ते आहेत असे त्यांनी सांगितले.
जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या कुडतरीच्या उमेदवार सोनिया फेर्नांडिस याना आलेमाव यांनी पाठिंबा दिला होता . सध्या जे रेल्वे मार्ग रुंदीकरण विरोधी आंदोलन चालू आहे त्या आंदोलनात आलेमाव यांनी काँग्रेसच्या बावट्याखाली भाग घेतला होता. त्यावेळीच त्यांचा काँग्रेस बरोबरचा कल स्पष्ट झाला होता.