लोकमत न्यूज नेटवर्क पेडणे : पेडणे मतदारसंघातील रवींद्र भवन, तुये येथील नवीन इस्पितळ, इलेक्ट्रॉनिक सिटी असे प्रकल्प प्रलंबित आहेत. ते लवकरच मार्गी लावले जातील. प्रकल्पांच्या कामाला चालना देण्यासाठी आमदार जीत आरोलकर पाठपुरावा करीत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
मोरजी येथील कळसदेव मांगर सभागृहामध्ये मांद्रे मतदारसंघातील आमदार जीत आरोलकर यांच्या महिला समर्थकांची सभा आयोजित केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री तथा उत्तर गोवा भाजप उमेदवार खासदार श्रीपाद नाईक, आमदार जीत आरोलकर, केरीच्या सरपंच धरती नागोजी, मांद्रे उपसरपंच तारा हडफडकर, तुये सरपंच सुलक्षा नाईक, पंच स्वीटी नाईक, पंच अनुपमा साळगावकर, सुनीता बुगडे देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी आणि मगो पक्षाने भाजप सरकारला पाठिंबा दिलेला आहे. भाजप सरकारचे ते घटक असल्यामुळे मांद्रे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे. शंभर टक्के योगदान मुख्यमंत्री या नात्याने मांद्रे मतदारसंघासाठी देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आमदार जीत आरोलकर हे सतत विकासासाठी भुकेलेले असतात. वेगवेगळ्या माध्यमातून ते विकासासाठी आपल्याकडे चर्चा करीत असतात, असेही गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, केंद्र सरकारने महिलांवर विश्वास ठेवून महिलांना केंद्रबिंदू मानून सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक योजना महिलांबरोबरच प्रत्येक घरापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी सरकार आणि सरकारचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. केंद्रीय मंत्री तथा उत्तर गोवा भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांनी आपल्या गेल्या २५ वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. विरोधी उमेदवारांनी देशासाठी राज्यासाठी काय केले? याची जाण जनतेला असल्याचे ते म्हणाले.
पक्षाने काय केले त्याची यादी खलपांनी द्यावी
ज्यावेळी केंद्रात आणि राज्यातही काँग्रेसचे डबल इंजिनचे सरकार होते. त्यावेळी काँग्रेस सरकारने काय केले. एक तरी योजना जनतेसाठी राबवली असेल, तर त्याची यादी द्यावी. अन्यथा मोदी सरकारने ज्या योजना आखलेले आहेत. त्यांचाच पाडाच वाचला जाईल आणि भाजप सरकारने आखलेल्या योजनांची पूर्णपणे माहिती जनतेलाही खलप यांनी द्यावी, असे थेट आव्हान मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.