गोव्यात वाढत चाललेले मद्यपानाचे व्यसन आता अत्यंत धोक्याच्या पातळीवर आले आहे. मद्यालयांची संख्या वाढतेय. दारू सहज उपलब्ध होत आहे. युवा आणि प्रौढ या दोन्ही घटकांचे आरोग्य दारूमुळे बरबाद होऊ लागले आहे. रात्री उशिरापर्यंत दारू पिणे, जागरणे करणे यातून अनेकांचे जीव कमी वयात जात आहेत. काल- परवापर्यंत आपल्यासोबत बसणारी व्यक्ती आज हृदयविकाराच्या धक्क्याने गेली, अशा बातम्या रोज थडकत आहेत. राज्य अत्यंत गंभीर स्थितीतून जात आहे.
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्याकडून परवाच लोकमतला सविस्तर माहिती मिळाली. गोव्यात टीबी रुग्णांची संख्या वाढतेय. क्षयरोगाचे रुग्ण वाढण्यामागे मद्यपान हे एक कारण असल्याचे बांदेकर म्हणाले. काहीजण रात्रंदिवस दारू ढोसतात. सुरुवातीला केवळ मित्रांना कंपनी देण्यासाठी म्हणून ग्लास घेऊन बसतात. मग व्यसन लागते. ते वाढत जाते व यकृत खराब होते. लिव्हर खराब झाल्याच्या केसेसदेखील वाढत आहेत, हे अत्यंत चिंताजनक आहे. आता गोमंतकीयांनी सावध होण्याची वेळ आली आहे. नव्या पिढीला तरी दारूचे व्यसन लागू नये म्हणून सरकारी व कौटुंबिक पातळीवरूनही उपाययोजना होण्याची गरज आहे खाओ, पिओ, मजा करो हे यापुढे चालणार नाही.
अगोदरच जीवनशैली बदलल्याने सर्व प्रकारच्या व्याधी कमी वयातच होत आहेत. मधुमेह रुग्णसंख्येबाबत गोवा खूप पुढे असल्याचा निष्कर्ष नुकताच सर्वेक्षणाअंती आला आहे. २०१९ साली पूर्ण देशात मधुमेहाचे एकूण ७० दशलक्ष रुग्ण होते. आता हे प्रमाण १०० दशलक्ष झाले आहे. देशातील १५.३ टक्के लोकसंख्या प्री-डायबेटीक आहे. भारतीयांच्या ढासळलेल्या आरोग्याचे हे लक्षण आहे. देशात ३५.५ टक्के लोकसंख्येला उच्च रक्तदाबाची समस्या आहे. पंजाबमध्ये ५१ टक्के लोकांना उच्च रक्तदाब (बीपी) आहे हे अधोरेखित करावे लागेल. गोव्यात २६.४ टक्के लोकांना मधुमेहाने घेरलेले आहे. उत्तर प्रदेशमध्ये मात्र हे प्रमाण फक्त ४.८ टक्के आहे. मद्रास डायबेटीस रिसर्च फाउंडेशन आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी मिळून हे सर्वेक्षण केले आहे. असे सर्वेक्षण मद्यपानाविषयी व लिव्हरशी संबंधित आजारांविषयी गोव्यात केले गेले तर धक्कादायक निष्कर्ष येण्याची भीती आहे.
डीन बांदेकर यांच्या मते गोमंतकीय माणूस टीबीवर औषध घेतो; पण सोबत मद्यपानदेखील करतो. म्हणजे एका बाजूने टीबी झालाय म्हणून औषधे घेतली जातात, वैद्यकीय उपचार सुरू ठेवले जातात व दुसऱ्या बाजूने मद्यपान बंद केले जात नाही. यकृताचा आजार जडल्याने अनेकांचा क्षयरोग औषधे घेऊनही बरा होत नाही. यकृत खराब होऊन क्षयरोगाला निमंत्रण मिळते. गोव्यात तांबडी माती-सांतइनेज येथे टीबी इस्पितळ आहे. तिथे रुग्णसंख्या वाढतेय. तंबाखू, सिगरेट, गुटख्याविरुद्ध मोहीम राबवली जाते. त्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण संख्येने थोडे तरी कमी झालेले असतील. गोव्यात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांमध्ये मात्र गुटखा सेवन, तंबाखू सेवन वाढत चालले आहे. टाइल्स फिटर, कार्पेटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन किंवा विविध कामे करण्यासाठी जे मजूर घरी येतात, त्यांच्यात गुटखा खाण्याचे प्रमाण जास्त आहे. गुटख्याप्रमाणेच अतिमद्यपानाचे दुष्परिणाम पटवून देण्यासाठीही एखादी मोहीम राबवावी लागेल. गोंयकारांना दारूच्या अतिसेवनापासून दूर ठेवावे लागेल.
गोवा म्हणजे मद्य हे समीकरण पर्यटकांच्या मनात ठसलेले आहे हे आपले दुर्दैव. गोव्याला जाणे म्हणजे भरपूर दारू ढोसणे ही देशी पर्यटकांची समजूत यापुढे चुकीची ठरवावी लागेल. पर्यटनाच्या नावाखाली मद्यालयांची संख्या सरकारने वाढवून ठेवली आहे. सासष्टी, बार्देश, मुरगाव, तिसवाडी या तालुक्यांमध्ये सर्वाधिक बार आहेत. जणू किनारपट्टीत मद्याच्या नद्या वाहतात. पणजी किंवा म्हापसा किंवा मडगावसारख्या शहरातही मद्यालये कमी नाहीत. वीस वर्षापूर्वी पूर्ण गोव्यात मद्यालये सहा-सात हजार होती. सरकार नव्या मराठी-कोकणी शाळा सुरू करायला परवानगी देत नाही; पण बार सुरू करायला लवकर परवाना मिळतो. 'दारूडे करूनी सोडावे सकल जन असे राज्यकर्त्यांनी ठरवलेले असू शकते.