लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी/मडगाव: राज्यात विविध विषयांवरून सुरू झालेली जनआंदोलने हा भाजपमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. राज्यासाठी नवा प्रादेशिक आराखडा तयार करा, अशी मागणी काही जण करू लागले आहेत, तर अनेकांनी गोव्यात मेगा हाऊसिंग प्रकल्प नको, अशी भूमिका घेतली आहे. एका बाजूने गोव्यात धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत आणि दुसऱ्या बाजूने विविध विषयांवरुन जनआंदोलनांना सरकारी यंत्रणांना सामोरे जावे लागत आहे. हा भाजपमध्ये अस्वस्थतेचाही विषय झाला आहे.
गेल्या पंधरवड्यात भुतानीच्या मेगा हाऊसिंग प्रकल्पाच्या विषयावरून राज्यात आंदोलनाची धग पेटली. आता आंदोलने व्यापक रूप घेऊ लागली आहेत. विविध गट आणि विविध राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करू लागले आहेत. पेडणे तालुक्यातही आंदोलन सुरू आहे. मोपा विमानतळ पीडितांना तिथे न्याय मिळालेला नाही, बेकायदा जमीन रूपांतरणांविरुद्धही विविध एनजीओ एकत्र आल्या आहेत.
दरम्यान, सांकवाळ येथील भुतानाची मेगा हाऊसिंग प्रकल्प अजून रद्द झालेला नाही. त्यावर आंदोलकांचे लक्ष आहेच, सरकार बेबनाव करू पाहतेय की काय, हे लवकरच कळून येईल. मेगा हाऊसिंग प्रकल्प रद्दच करा, अशी मागणी खासदार विरियातो फर्नांडिस, क्लॉड अल्वारीस आदींनी केली आहे.
पर्यावरणाची हानी खपवून घेणार नाही...
बुधवारी चिंचिणी येथे वेळळीचे आमदार कुझ सिल्वा यांच्या पुढकाराने आंदोलन व सभा झाली. लोकांच्या सहभागाने गोव्यासाठी नवा प्रादेशिक आराखडा तयार केला जावा, अशी मागणी त्या सभेत करण्यात आली. अभिजित प्रभुदेसाई, डायना तावारीस, अथनी सिल्या, काही पंच सदस्य, वाल्मीकी नायक, चेतन कामत, रामराव वाघ आदी अनेकांनी सभेत भाग घेतला. गोव्याच्या पर्यावरणाची हानी भाजप सरकार करत आहे ती आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकत्यांनी चिंचिणी येथे दिला.