पेडणे (निवृत्ती शिरोडकर) : पेडणे तालुक्यातील मालपे-पेडणे येथील राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या बाजूला उभारण्यात आलेली संरक्षक भिंत आज सकाळी अचानक कोसळली. त्याचवेळी महाराष्ट्र नोंदणीकृत कार तिथून जात असताना चालकाला भिंत कोसळत असल्याचे दिसताच त्याने वाहन थांबवल्याने सुदैवाने चौघे बचावले. या घटनेमुळे भिंतीच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
एम. व्ही. आर कंपनीकडे या कामाचे कंत्राट आहे. पेडणे तालुक्यातील पत्रादेवी ते म्हाखाजण धारगळपर्यंतच्या महामार्ग ६६ चे बांधकामाचे एमव्हीआर कंपनीला दिलेले आहे. मालपे महामार्गाचे काम करत असताना बायपास रस्ताही करण्यात आला आहे. पूर्वीचा जो राष्ट्रीय महामार्ग १७ होता त्याच रस्त्यावरून सर्व प्रकारची वाहने जात होती. परंतु महामार्ग ६६ चे काम सुरू झाल्यानंतर बायपास रस्ता करण्यात आला. या बायपास रस्त्याच्या बाजूला डोंगर आहे. रस्त्याच्या कामासाठी हा डोंगर उभा कापण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी येथे संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. संरक्षक भिंतीच्या कामावेळी हे डोंगर सरळ रेषेत कापल्यामुळे दरड कोसळण्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र, कंत्राटदारासह प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने भिंत कोसळण्याची घटना घडली.
गेल्या काही दिवसांपासून पेडणे तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. पावसामुळे कापलेल्या डोंगराच्या भागामध्ये पाणी जाऊन ती कमकुवत झाली. आज सकाळी १० च्या सुमारास अचानक दरड संरक्षक भिंतीवर कोसळली व भिंत थेट रस्त्यावर पडली. त्याचवेळी एक चारचाकी तिथून जात होती. चालकाला भिंत कोसळत असल्याचे लक्षात येताच त्याने वाहन थांबवल्याने मोठी जिवीत हानी टळली.
काही सेकंदावर मृत्यू थांबला होता
गोव्यातून महाराष्ट्राच्या दिशेने एक कार जात होती. त्या कारमध्ये चौघेजण होते. कार मालपे येथे आली असताना चालकाचे डोंगराकडे लक्ष गेले व त्याला दरड कोसळत असल्याचे दिसले. त्याने सावध होऊन वाहन थांबवल्यामुळे चौघांचा जीव वाचला. मृत्यू अवघ्या काही सेकंदावर येऊन थांबला होता पण दैव बलवत्तर म्हणून आपला जीव वाचला, असे त्या कार चालकाने सांगितले.
वाहने जपून चालवा
मालपे-पेडणे येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेले डोंगर कापण्यात आले आहेत. तसेच भविष्यातील धोका ओळखून डोंगर कापलेल्या बाजूने संरक्षक भिंतही उभारली आहे. मात्र, आजच्या घटनेने या संरक्षक भिंती कुचकामी ठरू शकतात हे दिसून आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावर ये-जा करताना सतर्कता ठेऊन वाहने चालवण्याचे आवाहन केले जात आहे.