लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: "एच३एन२' हा स्वाइन फ्लू म्युटेड इन्फ्लुएन्झा गोव्यात दाखल झाल्याची धक्कादायक माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे. या रोगाचे दोन रुग्णही गोव्यात आढळले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राज्यात 'एच३एन२'चे दोन रुग्ण सापडले असून, त्यांची प्रकृती ठीक आहे. यापैकी एक ज्येष्ठ असून, दुसरे लहान मूल आहे. ज्येष्ठ नागरिकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर लहान मूल गोमेकॉत असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेसाथरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी सांगितले.
कोविड लाटेचे संकेत
कोविडचे बाधित पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. देशात आणि राज्यातही कोविडबाधितांची संख्या वाढते आहे. चौथ्या लाटेचीही शक्यता वर्तविली जात आहे. गोव्यात २४ तासांत १७ नवीन कोविड बाधित आढळले आहेत. सक्रिय बाधितांची संख्या १०९ झाली आहे. १७० चाचणी अहवालातून हे बाधित आढळले आहेत. ११ जण कोविडमधून बरे झाले आहेत. सतर्क रहा, इन्फ्लुएन्झामुळे घाबरून जाऊ नका.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, राज्यात कोविड- १९ व इन्फ्लुएन्झासाठी निरीक्षण केले जात आहे. ज्या खबरदारी कोविडच्या संदर्भात घ्याव्या लागतात, त्याच खबरदारी इन्फ्लुएन्झाच्या बाबतीतही घ्याव्या लागतात.
आरोग्य खात्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वात वैयक्तिक स्वच्छता राखणे, वारंवार साबणाने हात धुणे, खोकताना किंवा शिंकताना तोंड झाकणे, शिंकणाऱ्या व खोकणाऱ्या लोकांशी जवळचा संपर्क टाळणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आदींचा समावेश आहे.
मुलांसाठी खबरदारी
आजारी मुलांनी शाळेत जाऊ नये व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ११ जण कोविडमधून बरे झाले आहेत. फ्लूसदृश्य लक्षणे आढळल्यास वयस्कर व इतर आजार असलेल्या लोकांनी नजीकच्या आरोग्य केंद्राला भेट द्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"