वासुदेव पागी
पणजी: माध्यम धोरणावर भाजप सरकारने घूमजाव केल्यावर गोव्यात संघ म्हणून कुणाला राहावे लागले असते तर त्यांना सरकारपुढे लोटांगण घालत राहावे लागले असते. त्यामुळेच गोव्यातील ९५ टक्के स्वयंसेवकांनी संघ सोडला असे गोव्याचे माजी संघप्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी त्यांच्या ‘लोटांगण’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सांगितले. प्रा. वेलिंगकर यांच्या लोटांगण या पुस्तकाचे रविवारी पणजीत प्रकाशन झाले.
प्रा. माधव कामत, वरिष्ठ पत्रकार गुरूदास सावळ आणि राष्ट्रीय बजरंगदलचे प्रमुख नितीन फळदेसाई यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. पुस्तक का लिहावे लागले हे सांगताना प्रा वेलिंगकर म्हणाले, गोव्यात भाजपने मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण या मूलभूत तत्त्वाशी फारकत घेतल्यानंतर केंद्रीय संघाने त्याला मूकसंमती दिली, इतकेच नव्हे तर त्याविरुद्ध आंदोलन करू नका यासाठी गोव्यातील स्वयंसेवकांवर दबाव टाकला. या दबावाला बळी पडून संघात राहिलो असतो तर भाजपसमोर लोटांगण घालीत राहावे लागले असते, जे गोव्यातील ९५ टक्के स्वयंसेवकांना मंजूर नव्हते. ज्येष्ठ संघ प्रचारक दुर्गादास नाडकर्णी यांच्या तालमीतील स्वयंसेवकांनी तत्त्वांशी प्रतारणा न करता संघ सोडला. स्वयंसेवकांच्या या त्यागाचे विस्मरण भविष्यात होऊ नये आणि अपप्रचराला बळी पडू नये यासठी हे पुस्तक लिहिल्याचे प्रा. वेलिंगकर यांनी सांगितले. दैनिक लोकमतला धन्यवाद देताना प्रा. वेलिंगकर यांनी सांगितले की सुरुवातीच्या काळात मातृभाषेसाठी लढा पुकारलेल्या स्वयंसेवकांची भूमिका मांडणारे लिखाण केले ते दैनिक लोकमने एक वर्षभर प्रसिद्ध केले. लोटांगण पुस्तक प्रकाशित होऊ नये आणि या प्रकाशनाला प्रसिद्धी माध्यमांनी प्रसिद्धी देऊ नये यासाठीही दबावतंत्राचा वापर झाल्याचा आरोपही प्रा. वेलिंगकर यांनी केला.