पणजी : बॉलिवूडच्या पार्श्वगायिका हेमा सरदेसाई यांनी आपल्या काही सहका-यांना घेऊन केलेल्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतली. सांतइनेज-पणजी येथील सर्व 29 झाडे वाचविण्याची ग्वाही मुख्यमंत्री सावंत यांनी सोमवारी सरदेसाई यांना दिली.सरदेसाई व प्रजल साखरदांडे यांची येथे पत्रकार परिषद झाली. साखरदांडे व सरदेसाई म्हणाल्या, की सांतइनेज स्मशानभूमीच्या व सौंदर्यीकरणाच्या कामासाठी एकूण 29 झाडे कापली जाणार होती. आम्ही त्याविरुद्ध आवाज उठवला.आमचा त्यामागे कोणताच वेगळा हेतू नव्हता व नाही. आम्हाला केवळ पणजीतीलच नव्हे तर गोवाभरातील झाडे वाचवायची आहेत. गोव्यात सगळीकडे हेरिटेज झाडे आहेत. ती वाचवायलाच हवीत. कारण गोवा हा खारट हवेचा प्रदेश आहे व येथे झाडांपासून मिळणारा ऑक्सीजन अत्यंत गरजेचा आहे. सरदेसाई म्हणाल्या, की मुख्यमंत्री सावंत यांनी रविवारी आपल्याला फोन केला व सांतइनेजची ती झाडे कापली जाणार नाहीत असे आश्वासन दिले. तुम्ही आश्वासन शंभर टक्के पाळणार आहात ना असे आपण मुख्यमंत्र्यांना विचारले व त्यांनी होकार दिला. आपण सोमवारी पुन्हा त्यांना फोन करून आश्वासनाची खात्री करून घेतली आहे. सांतइनेजची झाडे वाहतुकीला देखील अडथळा ठरत नाहीत.सरदेसाई म्हणाल्या की आपण मुख्यमंत्र्यांना एक याचिकाही सादर करणार आहे. जे झाड काढावेच लागते, ते मुळासकट काढून दुसरीकडे आहे तसेच लावण्यासाठीचे तंत्रज्ञान जगात उपलब्ध आहे. ते तंत्रज्ञान गोवा सरकारने गोव्यात आणावे, अशी विनंती आपण करीन.गोमंतकीयांनाच नोक-या द्यासरदेसाई म्हणाल्या, की पुढील पिढीसाठी आम्हाला गोवा राखून ठेवायचा आहे. गोमंतकीयांनाच गोव्यातील सरकारी क्षेत्रात व अन्य ठिकाणीही नोक-या मिळायला हव्यात. गोमंतकीयांना नोक-यांमध्ये प्राधान्य मिळावे म्हणून सरकारने पाऊले उचलावीत. गोव्याच्या पुढील पिढीला नोक-यांसाठी बाहेर जाऊन स्थायिक व्हावे लागू नये. आजच्या पिढीच्या मुलाबाळांसाठी आम्ही नोक:या राखून ठेवूया. साखरदांडे यावेळी म्हणाले, की गोवा विद्यापीठात देखील गोमंतकीय व्यक्ती नोकरीमध्ये दिसत नाहीत. केवळ एक-दोघेजण गोमंतकीय आहेत. कुणीही गोव्यात पंधरा वर्षे राहतात व गोमंतकीय बनतात. पंचवीस-तिस वर्षे जी व्यक्ती गोव्यात राहते, त्याच व्यक्तीला डोमिसाईल देण्याची व गोमंतकीय म्हणून मान्यता देण्याची तरतुद केली जावी.
बॉलिवूड पार्श्वगायिका हेमाच्या आंदोलनामुळे 29 झाडे वाचली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 7:50 PM