म्हापसा : हणजूण पोलिसांनी वेश्या व्यवसाय विरोधी केलेल्या कारवाईत गुमालवाडो-हणजूण येथे सुरू असलेला कुंटणखाना धाड टाकून उध्वस्त केला. या कारवाईत तीन महिला दलालासह सहा जणांना अटक करून चार युवतींची सुटका करण्यात आली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे.
हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक चेतन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार गुमालवाडो-हणजूण येथे वेश्या व्यवसाय भाड्याच्या खोलीत होत असल्याची खबर मिळाल्यानंतर दि. २७ रोजी रात्री ८.३० वा. निरीक्षक चेतन पाटील यांनी उपनिरीक्षक विश्वजित चोडणकर, हरिष वायंगणकर, विशाल मांद्रेकर, महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा पेडणेकर, कॉन्स्टेबल अनंत च्यारी, सुहास जोशी, विशाल नाईक, सत्येंद्र नास्रोडकर, प्रवीण पाटील, विनायक पालव, महिला पोलीस प्रतिज्ञा नाईक, श्वेता परब यांच्यासह त्या ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी तेथील चार खोल्यात चार युवती चार गिºहाईकांसोबत सापडल्या. हणजूण पोलिसांनी नेरूळ-ठाणे, अंधेरी मुंबई व मध्यप्रदेश येथील त्या चारही पिडीत युवतींची सुटका करून त्यांची रवानगी महिला सुधारगृहात केली. तर या युवतींना वेश्या व्यवसायासाठी आणून त्यांच्या जिवावर जगणाºया साईश शांताराम खरंगे (३३, रा. राजस्थान), शिनाझ सलीम खाजो (३७, रा. सांगली) व उज्वला महादेव कांबळे (३६, रा. सांगली) या कुंटणखाना चालवणाºया तिघा महिला दलाला विरूद्ध वेश्या व्यवसाय विरोधी गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. तसेच या कुंटणखाण्यात गिºहाईक म्हणून गेलेल्या मणी विरा वानन (२५, रा. पर्वरी), अमित जमालप्पा लमाणी (२०, रा. बागा कळंगुट), अल्ताफ बाबाजान खतीब (२५, रा. टिटोवाडा नेरूळ) व अन्य एक अल्पवयीन अशा चौघाना अटक करण्यात आली आहे.
भाड्याच्या खोलीत चालणारा हा कुंटणखाना बाजूला असल्याने सहसा कोणाच्या लक्षात येत नाही. रात्रीच्यावेळी रोजंदारीवरील मजूर कामगार असे लोक या ठिकाणी येत असतात. पंधरा दिवसापूर्वी संशयावरून हणजूण पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली होती त्यावेळी तेथे असलेल्या पुरूष व स्त्रिने नवरा-बायको असल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्यांना सी-फॉर्म भरावयास सांगण्यात आला होता तो त्यांनी सादर केला होता. एकदा पोलीस येऊन गेल्याने त्यांनी कुंटणखान्यास बिनधास्त सुरुवात केली होती.