पणजी : आमदार मायकल लोबो हे आमची छळवणूक करत आहेत. आमच्या पबमध्ये किंवा बार व रेस्टॉरंटमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा वेश्या व्यवसायही चालत नाही, असा दावा के. के. सुरेश, गजेंद्र सिंग उर्फ छोटू, सुनील भोमकर आदी व्यावसायिकांनी मंगळवारी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत केला. लोबो हे गेल्या दोन वर्षांपासून आमचा पिच्छा पुरवत आहेत. आम्हा तिघांचेही बार व रेस्टॉरंट सीआरझेडमध्ये येत नाहीत. तरीही लोबो स्वत: जेसीबी घेऊन आले. त्यांनी पोलिसांनादेखील सोबत आणले नव्हते. लोबो यांनी स्वत:च्या आठ-दहा गुंडांना आणले आणि आमचे रेस्टॉरंट मोडून टाकले. तसेच आमच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली, असे गजेंद्र सिंग व के. सुरेश यांनी सांगितले. आमची सगळ्यांची रेस्टॉरंट रात्री अकरा वाजता बंद होतात; पण आमदार लोबो यांचे रेस्टॉरंट मात्र चोवीस तास सुरू असते. आम्हाला लोबो किंवा उत्तर गोवा पीडीएने अगोदर नोटीसही दिली नाही. सध्या जी नोटीस दाखवली जाते, ती २३ रोजी पाठविली गेली आहे; पण तत्पूर्वी २१ रोजी लोबो यांनी आमची बांधकामे मोडून मोठे नुकसान केले. कळंगुट मतदारसंघात अकरा डान्स बार चालतात, असे लोबो म्हणतात. मात्र, कारवाई करताना त्यांनी आमच्या तीनच रेस्टॉरंटविरुद्ध केली, असे गजेंद्र सिंग म्हणाले. आमच्याकडे सर्व प्रकारचे परवाने आहेत. आमच्याविरोधात कधीच पोलिसांत गुन्हेही नोंद झालेले नाहीत. रोज पोलिसांकडून आमच्या जागेची पाहणी केली जाते. त्यांना कधीच काही आक्षेपार्ह सापडले नाही. लोबो यांनी माझे रेस्टॉरंट मोडतेवेळी मला व माझ्या मुलालाही मारहाण केली. म्हणूनच मी त्यांच्याविरोधात पोलिसांत एफआयआर नोंदवला आहे, असे के. सुरेश या ६५ वर्षीय व्यावसायिकाने सांगितले. आम्ही लोबो यांचे आर्थिक हितसंबंध न जपल्याने आमचेच रेस्टॉरंट त्यांनी मोडले, असे गजेंद्र सिंग म्हणाले. आमच्या जीवितास धोका असून आपल्या जीवाचे कधी काही वाईट झाले, तर त्यास लोबोच जबाबदार असतील, असे ते म्हणाले. (खास प्रतिनिधी)
लोबोंकडून छळवणूक!
By admin | Published: February 25, 2015 2:57 AM