पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: सीआरझेड नियमांचे उल्लंघन करुन बेकायदेशीरपणे उभारलेली १२५ बांधकामे पाडण्याचा ठराव घेतला आहे. १२५ पैकी ८८ बांधकामांना तशी नोटीस जारी केल्याची माहिती हरमल पंचायतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सोमवारी दिली.
हरमल येथील बेकायदेशीर बांधकाम प्रश्नी सोमवारी सुनावणी झाली. यावेळी हरमल पंचायतीने प्रतिज्ञापत्राव्दारे वरील माहिती न्यायालयाला दिली. १२८ पैकी ८८ बांधकामांना नोटीस जारी केली आहे, तर उर्वरीत बांधकामांना पुढील १० दिवसांत नोटीस जारी केली जाईल असेही पंचायतीने नमूद केले आहे.
हरमल पंचायत क्षेत्रातील गिरकवाडो येथे सीआरझेड नियमांचे उल्लंघन किनारपट्टीवर उभारलेली २१६ बांधकामे ही बेकायदेशीर असल्याचे गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने केलेल्या तपासणीत आढळून आले होते. त्यानंतर या बांधकामांना स्थानिक पंचायतीने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यात माजी सरपंच बेर्नाड फर्नांडिस व त्यांच्या कुटुंबियांनी उभारलेल्या तात्पुरत्या दहा बेकायदेशीर बांधकामांचाही समावेश होता.