किशोर कुबल/पणजी
पणजी : आसगांव येथे बाउंसर आणून गोमंतकीय कुटूंबाचे घर पाडल्याच्या घटनेचा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी निषेध केला आहे. राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्था परप्रांतियांना आउटसोर्स केली आहे का?, असा संतप्त सवालही त्यानी केला आहे.
सरदेसाई म्हणाले की,‘ परराज्यातून येथे आलेले लोक बाउन्सर आणि अर्थमूव्हर्स बाळगू शकतात. गोमंतकीयाचे घर त्याच्या स्वत:च्या भूमीतच उद्ध्वस्त करू शकतात, त्याचे अपहरण करू शकतात आणि एवढं सर्व काही करुन गोव्यात तासनतास मोकळेपणाने फिरू शकतात हा प्रकार पाहून मी पूर्णपणे स्तब्ध, संतप्त आणि व्यथित झालो आहे. राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्था बाहेरच्या लोकांना आउटसोर्स केली आहे का? दिल्ली, उत्तरप्रदेशमध्ये वापरल्या जाणाऱ्या अशा रानटी पद्धतींना प्रोत्साहन देऊन पोलिस आपले अपयश दाखवू पहात आहेत का? आदी प्रश्न सरदेसाई यांनी केले आहेत.
आसगांव येथे दिल्लीच्या एका महिलेने बाउंसर्स आणून गोमंतकीय पिता, पुत्राचे अपहरण करुन पाच तास त्यांना ओलिस ठेवले व जेसीबी आणून त्यांचे घर जमीनदोस्त केल्याचा आरोप आहे.