पणजी : 'गोवा विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असूनही सत्तेपासून दूर ठेवून याआधी अन्याय केला, त्याची पुनरावृत्ती करू नका', असे साकडे आम्ही राज्यपालांना घातले असून सत्ता स्थापनेचा दावा त्यांच्याकडे केला आहे, अशी माहिती गोव्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी दिली.
त्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दुपारी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना कवळेकर म्हणाले की, राज्यपालांनी आम्हाला 'तुमचे पटतेय , असे सांगितले असून उशीर होऊ नये म्हणून तुम्ही घेतलेली खबरदारी चांगलीच आहे.', असेही म्हटले आहे त्यावरून आम्ही आशावादी आहोत आणि सायंकाळपर्यंत आम्हाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देतील, अशी आशा धरून आहोत. कवळेकर म्हणाले की, २०१७ साली निवडणूक झाली. निकालही लागले तेव्हा सुद्धा काँग्रेस विधानसभेत १७ आमदारांसह सर्वात मोठा पक्ष होता आजही आमच्याकडे १४ संख्याबळ असून भाजपकडे केवळ ११ जण आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होण्याआधी नवे सरकार स्थापन व्हायला हवे. सत्तास्थापनेसाठी दावा करण्यास उशीर केला, असे कारण राज्यपालांनी देऊ नये म्हणून आम्ही ही भेट घेतली.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राज्यपालांना घटनेप्रमाणे वागावे, असे आवाहन केले असून सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला आधी निमंत्रण द्यावे, असे आवाहन राज्यपालांना केले आहे. सायंकाळपर्यंत काँग्रेसला निमंत्रण येईल, अशी आशा चोडणकर यांनीही व्यक्त केली आहे.