लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः बंगालच्या महासागरात डिप्रेशन तयार झाल्यामुळे सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. काल पावसाने राज्याला पुन्हा झोडपले. सकाळपासूनच मुसळधार सुरू होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका केरी- सत्तरी, वाळपई, केपेसह डिचोली परिसराला बसला असून राज्यात ९३ इंच पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे अनेक भागातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. भुईपाल परिसरातील १२ हून अधिक घरांत पाणी शिरले असून तेथील लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. झाडांच्या पडझडीमुळे वीजपुरवठ्यावरही परिणाम झाला.
सत्तरीत नद्या, नाले तुडुंब भरले असून पूरस्थिती आहे. होडा वडदेव देवस्थानाजवळ वाळवंटी नदीला पूर आल्याने १२ घरांत पाणी शिरले. सत्तरीला पुराचा धोका कायम आहे. रात्रभर पावसाचा जोर राहिला तर मात्र दोन वर्षांची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे सरकारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. म्हादईच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अंजुणेतून विसर्ग, ९० मीटरवर पाणी पातळी
संततधार पाऊस सुरु असल्याने राज्यातील सर्वच धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. साळावली तिळारीसह आमठाणे, गवाणे, पंचवाडी धरणे भरली होती. आता अजुणे धरणाची पाणी पातळी ९० मीटरवर पोहोचली आहे. धरणाचे चारही दरवाजे खुले झाले असून विसर्ग सुरू झाला.
डोंगराचा भाग कोसळला
पावसामुळे कुडचडे केपे येथील टाळी-शेल्डे परिसरात भूस्खलन झाले. यात विठ्ठल हुलगेकर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस सुरू असतानाच मोठा आवाज आल्याने घरातील सर्वजण बाहेर धावले असता डोंगराचा एक भाग कोसळून हलगेकर यांच्या घराच्या दिशेने आला व क्षणार्धात हा प्रवाह घरात शिरून मोठे नुकसान झाले.
भुईपाल भागात १२ घरांत शिरले पाणी
पावसामुळे होंडा पंचायत क्षेत्रातील काही भागात संरक्षक भिंत नसल्याने ओहळातील पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. भुपाल -भेडशेवाडा २ येथील साया फूल पाण्याखाली गेला. तर वहदेवनगर येथे प्रमुख ओहळाच्या बाजूला असलेल्या १२ घरांमध्ये पाणी शिरुन मोठे नुकसान झाले आहे. ओहळाच्या बाजूला असलेल्या काही घरातील नागरिकांना होडा- वाळपई रस्ता गाठण्यासाठी गळाभर पाण्यातून वाट काढत जावे लागले.