लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून, जनवजीवन विस्कळीत झाले. सलग चार दिवसांच्या जोरदार पावसासह १ जूनपासून आतापर्यंत पावसाने ७५ इंचांचा आकडा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात इंच पावसाची नोंद झाली. नद्यांच्या पाणी पातळीत गतीने वाढ होत असल्याने सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी आपत्कालीत व्यवस्थापन समितीला निर्देश दिले आहेत.
गेल्या २४ तासांत फोंडा केंद्रात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. फोड्यात २४ तासांत ४.४ इंच पाऊस झाला. तर त्याखालोखाल पेडणे केंद्रात ४.३ इंच पाऊस झाला. सांगे केंद्रात ४.० इंच पावसाची नोंद झाली आहे. तर राजधानी पणजीत ३ इंच पावसाची नोंद झाली आहे. गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक भागांत पूरस्थिती झाली आहे. नद्या, ओहोळ तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक भागांत पडझडही झाली आहे. काही भागांत घरांवर दरडी, तसेच झाडे कोसळून घरांचे नुकसान झाले आहे. काही जणांच्या घरांत पुराचे पाणी शिरले. त्याचप्रमाणे रस्त्यावर झाडे पडून अडथळा निर्माण झाला.
जनजीवन विस्कळीत
मुसळधार पाऊस पडत असल्याने राज्याच्या अनेक भागांत विजेची समस्या निर्माण झाली आहे. काही ठिकाणी विजेच्या खांबावर झाडे पडली, तसेच खांब उन्मळून पडल्याने राज्यात काही भागांत वीज गायब होण्याच्या घटना घडल्या. पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवनही विस्कळीत झाले आहे...
सांगेत सर्वाधिक पाऊस
१ जून ते आतापर्यंत सर्वाधिक पाऊस सांगे केंद्रात झाला आहे. येथे एकूण ८६.४ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर केपे ८४.३ इंच, मडगाव केंद्रात ८२.४, तर वाळपई केंद्रात ७६.६ पावसाची नोंद झाली आहे. राजधानी पणजीत ७३.१ इंच पावसाची नोंद झाली आहे.
'तिळारीतून पाणी सोडणार
दरम्यान, तिळारी धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने धरणातील पाणी आज, शनिवारी सोडण्यास सुरुवात केली जाईल. त्यामुळे सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुका आणि गोव्यातील पेडणे आणि डिचोली तालुक्यातील खालच्या भागातील गावांना पूर येण्याची शक्यता आहे. जलस्रोत खात्याच्या अधिकायांनी आजूबाजूच्या लोकांना अलर्ट राहण्याचे आवाहन केले आहे.
पूरस्थितीवर मंत्री राणेंची नजर
सत्तरीत मुसळधार पाऊस पडत असून, पाण्याची पातळी वाढल्याने अनेक नद्या तुडुंब वाहत आहेत. येथील पूरस्थितीवर वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी नजर ठेवली आहे. कोणत्याही प्रकारची आवश्यकता भासल्यास, टीम तत्परतेने मदतीस केले आहे. मंत्री राणे यांनी सांगितले की, 'जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाण्याच्या पातळीतील बदलाची माहिती देण्यासाठी निर्देश दिले आहेत. उत्तर आणि दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी हे वैयक्तिकरीत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. प्रभावी मदतीसाठी यंत्रणांमध्ये समन्वय ठेवला जात आहे.