पणजी : गोव्यात सर्वत्र पावसाने कहर माजवला असून संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागात पाणी साचल्याने ठिकठिकाणी वाहतूक तुंबली. राजधानी शहरात सकाळी ८.३० नंतर चार तासात तब्बल तीन इंच पावसाची नोंद झाली. पेडणे तालुक्यात जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले. ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरु असून काही ठिकाणी अनेक तास वीज गुल झाली आहे.
हवामान वेधशाळेने उद्या ३० सप्टेंबर ॲारेंज ॲलर्टचा इशारा दिला आहे. गुरुवारपासून पावसाने जोर धरला. ताशी ४० ते ५० किलोमिटर वेगाने वारे वाहील, असा इशारा वेधशाळेने दिला आहे.वाय्राबरोबरच ठिकठिकाणी मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. अनंत चतुर्दशी दिवशी सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांमध्येही पावसाने व्यत्यय आणला. साखळी, केपें, सांगेत तुलनेत कमी पाऊस झाला. राजधानी शहर, जुने गोवें, मडगांव, दाबोळी, मुरगांवमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.
गुरुवारी रात्रभर संततधार होती. सकाळी ८.३० वाजता संपलेल्या २४ तासात म्हापशात २.५९ इंच, पेडणेत १.२१ इंच, फोंड्यात २.९१ इंच, पणजीत २.९७ इंच, जुने गोवेंत ३ इंच, साखळीत १.१४ इंच, दाबोळीत ४.५९ इंच, मडगांवमध्ये ४.१९ इंच, मुरगांवमध्ये ३.८८ इंच, केपेंत ०.७१ इंच व सांगेत १ इंच पावसाची नोंद झाली.