पणजी - सेरुला कोमुनिदाद जमीन घोटाळा प्रकरणी महसूलमंत्री रोहन खंवटे हे गप्प का?, असा सवाल 'लोकांचे आधार' चे सर्वेसर्वा ट्रोजन डिमेलो यांनी केला असून कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याने पुढील काळात अवमान याचिकेसंदर्भात न्यायालयीन पाऊल उचलण्याचाही इशारा दिला आहे.
पत्रकार परिषदेत डिमेलो म्हणाले की, ' सेरुला कोमुनिदादच्या बेकायदेशीरपणे विकल्या गेलेल्या जमिनी ताब्यात घेण्याचा आदेश कोर्टाने दिला असताना कोणतीही कारवाई झालेली नाही. माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांचे सेरुला भूखंड घोटाळा प्रकरण गाजत आहे. मध्यंतरी या प्रकरणात क्राइम ब्रांच पोलिसांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर छापा टाकून काही फाईल्स जप्त केल्या होत्या तर काही फाईल्स अजूनही गायब आहेत.
२०१७ साली एप्रिल मध्ये पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये रोहन खंवटे हे महसूलमंत्री आहेत. त्यांनी या घोटाळ्याबाबत कोणतेच पाऊल उचललेले नाही. विरोधात असताना खंवटे यांनी विधानसभेत या प्रकरणावर वारंवार आवाज उठवला होता. परंतु सत्तेवर आल्यानंतर त्यांनी काहीच केले नाही, यामागेही तसेच कारण असावे असा दावा करताना डिमेलो यांनी असाही संशय व्यक्त केला की, परुळेकर यांच्यावर कारवाई केल्यास खंवटे यांची सर्व प्रकरणे बाहेर काढण्याचा इशारा भाजपाने दिला असावा म्हणूनच ते या प्रकरणात गप्प आहेत. ६ मे २०१६ रोजी हायकोर्टाने जनहित याचिकेत दिलेला आदेश व त्यानंतर उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी कोमुनिदाद प्रशासकांना २५ जुलै २०१६ रोजी या आदेशाचे पालन करण्याचे दिलेले निर्देश याचा उल्लेख डिमेलो यांनी केला आहे. विधानसभेत खंवटे यांनी या प्रकरणात चौकशीसाठी सभागृह समिती नियुक्त करावी अशी मागणी केली होती. हे सर्व एक नाटक होते, असा आरोप डिमेलो यांनी केला आहे.
दरम्यान जी-६ गटातील गृहनिर्माणमंत्री जयेश साळगावकर यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात साळगाव वासियांना सखोल चौकशी करण्याचे परुळेकर यांची कथित लूट उघडकीस आणण्याचे आश्वासन दिले होते त्याची आठवण मी गोवा फॉरवर्डमध्ये असताना गेल्या १४ जून रोजी साळगावकर यांना पत्र लिहून केली होती आणि या प्रकरणात कोणतीच कारवाई झालेली नाही त्यामुळे पाऊल उचलावे अशी मागणी केली होती. परंतु साळगावकर आजवर गप्पच आहेत.
डिमेलो यांनी पुढे असेही म्हटले आहे की, जी-६ गटाचा सिक्स एकही मंत्री किंवा आमदार जोपर्यंत भाजपाध्यक्षपदी अमित शहा आहेत तोपर्यंत भाजपापासून दूर जाऊ शकणार नाही कारण तसा कोणताही प्रयत्न त्यांनी केला या आमदारांची लूट माहीत असल्याने त्यांची रवानगी शहा हे कोलवाळच्या कारागृहात करतील.'